सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताविरुद्धची ट्वेन्टी-20 मालिका जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियाने चांगलीच कंबर कसली आहे. कारण आता तिसरा सामना जिंकून त्यांना मालिका जिंकता येणार आहे. त्यामुळे त्यांनी तिसऱ्या सामन्यासाठी संघामध्ये जगातील सर्वात वेगवान गोलंदाजाला स्थान दिले आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आतापर्यंत दोन सामने झाले आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने चार धावांनी विजय मिळवला होता. त्यानंतर दुसऱ्या सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे दोन सामन्यांनंतर या मालिकेत ऑस्ट्रेलियाकडे 1-0 अशी आघाडी आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने जर तिसरा सामना जिंकला तर त्यांना मालिका 2-0 अशा फरकाने जिंकता येणार आहे. पण जर भारताने हा सामना जिंकला तर मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटू शकेल. पण जर तिसरा सामना रद्द करावा लागला तर ऑस्ट्रेलिया ही मालिका 1-0 या फरकाने जिंकू शकणार आहे.
तिसरा सामना दोन्ही संघांसाठी निर्णायक ठरणार आहे. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने तब्बल दोन वर्षांनंतर जगातील सर्वात वेगवान गोलंदाज म्हणजेच मिचेल स्टार्कला संघात स्थान दिले आहे. स्टार्कला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे त्याचा ऑस्ट्रेलियाच्या संघाला चांगलाच फायदा होईल, असे जाणकार सांगत आहेत.