IND vs AUS T20 2022 Live Match - भारताने ०-१ अशा पिछाडीवरून ही मालिका २-१ अशी जिंकताना विश्वविक्रम केला. ऑस्ट्रेलियाच्या १८७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व लोकेश राहुल स्वस्तात माघारी परतले. पण, विराट कोहली ( Virat Kohli) व सूर्यकुमार यादव ( surayakumar yadav) यांनी तिसऱ्या विकेटसाठी शतकी भागीदारी करून भारताच्या विजयाचा पाया रचला. सूर्यकुमार व विराट या दोघांनी वैयक्तिक अर्धशतक झळकावले आणि त्यानंतर हार्दिक पांड्याने त्याचे काम केले. या सामन्यात विराटने दमदार खेळ करताना भारताचा माजी कर्णधार व सध्याचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) चा विक्रम मोडला
लोकेश राहुल ( १) व रोहित शर्मा ( १७ ) माघारी परतले. सूर्यकुमार व विराट यांनी १०४ धावांची भागीदारी करून डाव सावरला. सूर्यकुमार ३६ चेंडूंत ५ चौकार व ५ षटकार खेचून ६९ धावांवर झेलबाद झाला. भारताला १८ चेंडूंत ३२ धावा करायच्या होत्या. पॅट कमिन्सने १८व्या षटकात ११ धावा दिल्या आणि भारताला अखेरच्या दोन षटकांत २१ धावा करायच्या होत्या. हार्दिकने १९व्या षटकात हेझलवूडला पहिलाच चेंडू षटकार खेचला. तरीही या षटकात १० धावा आल्याने आता ६ चेंडू ११ धावा भारताला करायच्या होत्या. विराटने पहिलाच चेंडू षटकार खेचला. पण, पुढच्याच चेंडूवर विराट बाद झाला. त्याने ४८ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६३ धावा करून आपलं काम केलं.
आता भारताला ४ चेंडूंत ५ धावा हव्या होत्या आणि दिनेश कार्तिकने एक धाव घेतली. हार्दिकने चौकार खेचून विजय पक्का केला. हार्दिक १६ चेंडूंत २५ धावांवर नाबाद राहिला. कॅलेंडर वर्षात सर्वाधिक २१ ट्वेंटी-२० सामने जिंकणारा भारत हा पहिला संघ ठरला. त्यांनी पाकिस्तानचा २० विजयाचा विक्रम मोडला. भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत विराट दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. विराटच्या २४०७८ धावा झाल्या असून त्याने राहुल द्रविडचा ( २४०६४ ) विक्रम मोडला. सचिन तेंडुलकर ३४३५७ धावांसह आघाडीवर आहे.
पाहा व्हिडीओ...
कॅमेरून ग्रीनचा ( Cameron Green) तडाखा पाहून ऑस्ट्रेलिया आज धावांचा डोंगर उभा करेल असेच चित्र होते. पण, अक्षर पटेल ( Axar Patel) व युजवेंद्र चहल यांनी भारताला पुनरागमन करून दिले. त्यात ग्लेन मॅक्सवेलच्या ( Glenn Maxwell) विकेटने सामन्यात थोडासा गोंधळ उडालेला पाहायला मिळाला. अखेरच्या काही षटकांत टीम डेव्हिडने ( Tim David) भारतीय गोलंदाजांना धु धु धुतले आणि तगडे आव्हान उभे केले. कॅमेरून ग्रीनने २१ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांसह ५२ धावा चोपल्या. टीम डेव्हिड २७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकार खेचून ५४ धावांवर माघारी परतला. सॅम्स २८ धावांवर नाबाद राहिला. भुवीने ३ षटकांत ३९ ( १ विकेट) धावा, जसप्रीतने ४ षटकांत ५० धावा दिल्या. अक्षरने ३३ धावांत ३ विकेट्स घेतल्या. युजवेंद्र चहलनेही २२ धावांत १ विकेट घेतली.
Web Title: ind vs aus 3rd t20 Int Live Scorecard Live Streaming : Watch Virat Kohli's outstanding 63(48) innings; he has surpassed Rahul Dravid to become 2nd leading run scorer for India in international cricket, Video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.