Rohit Sharma, IND vs AUS: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ३ सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाला पराभूत केले. १-१ अशी मालिका बरोबरीत असताना, ऑस्ट्रेलियाने पहिल्यांदा फलंदाजी करताना १८६ धावा केल्या. टीम डेव्हिड आणि कॅमेरॉन ग्रीन या दोघांनी अर्धशतके ठोकत संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. पण सूर्यकुमार यादव आणि विराट कोहली या दोघांच्या अर्धशतकांच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना आणि मालिका जिंकली. टी२० वर्ल्ड चॅम्पियन संघ असलेल्या ऑस्ट्रेलियाला मालिकेत पराभूत केल्यानंतरही रोहित काहीसा नाराज दिसला. सामन्यानंतर मुलाखती दरम्यान त्याने या नाराजीचे कारण सांगितले.
--
"टी२० क्रिकेटमध्ये काही वेळा तुमचे अंदाज चुकतात, पण या फॉरमॅटमध्ये तुम्हाला छोटी चूकदेखील खूप महागात पडू शकते. या मालिकेत आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला. थोडी जोखीम उचलली पण त्याचा फायदा झाला. काही वेळा प्रयोग फसतात, पण त्यातून शिकायला मिळते. मालिका जिंकलो असलो तरी एक सर्वात मोठा चिंतेचा विषय म्हणजे, शेवटच्या टप्प्यातील आमची गोलंदाजी. डेथ बॉलिंगचा विषय सध्या चर्चेत आहे. पण मला असे वाटते की हर्षल पटेल आणि जसप्रीत बुमराह ही जोडी बऱ्याच काळानंतर एकत्र खेळत आहे. ऑस्ट्रेलियाकडे ८व्या नंबरपर्यंत फलंदाज होते, हे माहिती असूनही या दोघांनी भेदक गोलंदाजी केली. मी त्या गोष्टीकडे लक्ष देणार नाही. हे दोघे ब्रेकनंतर खेळत आहेत, काही सामन्यांत ते बरोबर सामन्यानुसार गोलंदाजी करतील", असे रोहित शर्मा म्हणाला.
"हैदराबादच्या मैदानावर मालिका जिंकणे ही खूपच चांगली बाब आहे. मी सुरूवातीला डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळत असताना माझ्या येथील खूप आठवणी आहे. सामन्याबद्दल बोलायचे तरी मला आज खूप काही मिळाले. आज आम्हाला सर्वस्व पणाला लावून खेळायचं होते, आणि आमच्या खेळाडूंनी कामगिरी फत्ते केली. या मालिकेतील सर्वात चांगली बाब म्हणजे, प्रत्येक सामन्यात वेगवेगळ्या खेळाडूंनी सामना जिंकवून दिला, त्यामुळे एकाच खेळाडूला फार भार किंवा जबाबदारी पडली नाही. जेव्हा तुम्ही बाहेर बसून संघाचे असे विजय पाहता, त्यावेळी तुम्ही खूप खुश होता. संघाचे व्यवस्थापन पाहून तुम्हाला नक्कीच फार बरं वाटतं आणि माझीही तीच भावना आहे", असेही रोहितने स्पष्ट केले.