Changes in Team India for IND vs AUS 3rd T20 : भारतीय क्रिकेट संघ सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये असल्याचे दिसत आहे. या संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या जात असलेल्या पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत चमकदार कामगिरी केली आहे. पहिले दोन सामने जिंकून भारताने 2-0 अशी आघाडी घेतली आहे. तिसरा सामना मंगळवारी गुवाहाटी येथे होणार आहे. टीम इंडियाची नजर हा सामना जिंकून मालिकेत अजिंक्य आघाडी घेण्यावर असेल. टीम इंडियाने हा सामना जिंकला तर मालिका भारताच्या नावावर होईल. त्यामुळे कॅप्टन सूर्यकुमार आपल्या सर्वोत्तम ११ खेळाडूंना घेऊन मैदानात उतरेल. त्यात एक बदल केला जाण्याची शक्यता आहे.
कोणाला मिळू शकतो संघातून डच्चू?
टीम इंडियाने पहिल्या दोन सामन्यात समान संघ मैदानात उतरवला होता. विशाखापट्टणम येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारताने रोमहर्षक विजय मिळवला होता. तर तिरुवनंतपुरम येथे झालेल्या दुसऱ्या सामन्यात भारताला सहज विजय मिळवता आला होता. पण तिसऱ्या सामन्यात मात्र संघात एका खेळाडूची गच्छंती होण्याची शक्यता आहे. कोणताही कर्णधार आपल्या विजयी संघात बदल करू इच्छित नाही. पण सूर्यकुमार यादव या सामन्यात एक बदल करू शकतो. सूर्यकुमार आपल्या संघात अतिरिक्त गोलंदाजीचा पर्याय समाविष्ट करू शकतो. संघात सध्या पाच गोलंदाज आहेत. या सामन्यात सूर्यकुमार टिलक वर्माला वगळून शिवम दुबेवर विश्वास दाखवू शकतो. शिवम दुबे हा अष्टपैलू खेळाडू आहे. तो संघात आला तर फलंदाजीसह सहाव्या गोलंदाजीचा पर्यायही मिळेल.
असा असू शकतो टीम इंडियाचा बदललेला संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, प्रसीध कृष्णा.