मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघाचे पारडे जड झाले आहे. मयांक अग्रवालच्या दमदार सुरुवातीनंतर चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची परीक्षा घेतली. पुजाराने कसोटी कारकिर्दीतील 17वे शतक झळकावले. पण, कोहलीचे शतक 18 धावांनी हुकले. मिचेल स्टार्कने कोहलीला 82 धावांवर माघारी पाठवले. त्यापाठोपाठ पुजाराही 106 धावांवर बाद झाला. यो दोघांनी भारताला मजबूत स्थितीत आणले आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी रडीचा डाव सुरू केला.
कोहली व पुजारा यांनी पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना यश मिळवू दिले नाही. मात्र, उपाहारानंतर हे दोघेही माघारी परतले. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सामन्यात पुनरागमन करण्याचे स्वप्न पडू लागले. उपकर्णधार अजिंक्य रहाणे आणि रोहित शर्मा या मुंबईकर जोडीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. चहापानापर्यंत या दोघांनी नाबाद 47 धावांची भागीदारी करत भारताची धावसंख्या वेगाने वाढवली.