मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : जसप्रीत बुमराच्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. बुमराने सहा फलंदाजांना माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर संपुष्टात आणला. भारताने पहिला डाव 7 बाद 443 धावांवर घोषित केला. ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन न देता कर्णधार विराट कोहलीने पुन्हा फलंदाजीला मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला. बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी बुमराची कामगिरी उल्लेखनीय ठरली. सहा विकेट घेत त्याने कॅलेंडर वर्षात सर्वात 45 विकेट्स घेण्याचा भारतीय गोलंदाजांचा विक्रम नावावर केला.
बुमराने याशिवाय आणखी एक पराक्रम केला. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बुमराने एका डावात पाचपेक्षा अधिक विकेट घेतल्या आहेत. कॅलेंडर वर्षांत अशी कामगिरी करणारा तो पहिलाच आशियाई गोलंदाज आहे. त्याने आफ्रिकेविरुद्ध जोहान्सबर्ग येथे 54 धावांत 5 आणि इंग्लंडविरुद्ध ट्रेंट ब्रिज येथे 85 धावांत 5 विकेट घेतल्या होत्या. मेलबर्नवर ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 33 धावांत 6 विकेट घेतल्या.
बुमराने या दौऱ्यात पाच डावांत एकूण 17 विकेट घेतल्या आहेत. त्याने 14.11 ची सरासरी राखली, तर 2.08 चा इकॉनॉमी रेट ठेवला. ऑस्ट्रेलियातील ही भारतीय गोलंदाजाची चौथी सर्वोत्तम कामगिरी आहे. या विक्रमात कपिल देव ( 8/106), अनिल कुंबळे ( 8/141) हे आघाडीवर आहेत. बुमराने अजित आगरकरचा ( 6/41) विक्रम मोडला.