मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजाराने ( 106) सातत्यपूर्ण कामगिरी कायम राखताना मेलबर्नवर सुरू असलेल्या बॉक्सिंग डे कसोटीचा दुसरा दिवस गाजवला. त्याने कारकिर्दीतील 17 वे शतक पूर्ण केले आणि त्यासाठी त्याने 280 चेंडूंचा सामना केला. पुजारा 319 चेंडूंत 10 चौकारांच्या मदतीने 106 धावा करून माघारी परतला. या मालिकेतील त्याचे हे दुसरे शतक आणि ऑस्ट्रेलियाविरुद्धचे चौथे कसोटी शतक ठरले.
भारताने 2 बाद 215 धावांवरून दुसऱ्या दिवसाची सुरुवात केली होती. पुजारा 68 आणि कर्णधार विराट कोहली 47 धावांवर खेळत होते. दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात पुजारा आणि कोहलीने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. कोहलीने पहिल्याच षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार खेचून 20वे अर्धशतक पूर्ण केले. पुजाराने 114 व्या षटकांत नॅथन लियॉनच्या गोलंदाजीवर चौकार मारून शतक झळकावले.
या शतकासह त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाला मागे टाकले. कसोटी क्रिकेटमध्ये गांगुलीच्या नावावर 16 शतकं आहेत आणि पुजाराने हा विक्रम मोडला. त्याने व्ही व्ही एस लक्ष्मणच्या 17 कसोटी शतकांशी बरोबरी केली आहे.