Nathan Lyon, IND vs AUS 3rd test: भारताविरूद्धच्या तिसऱ्या कसोटीत भारताचाच डाव भारतावर उलटला. पहिल्या डावात भारत १०९ धावांवर ऑल आऊट झाला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १९७ धावांपर्यंत मजल मारली. त्यानंतर भारताचा दुसरा डाव १६३ धावांत आटोपला. त्यामुळे आता तिसरी कसोटी रंजक वळणावर आली आहे. चेतेश्वर पुजारा (५९) वगळता बाकी सारे फलंदाज ढेपाळले. ऑस्ट्रेलियाचा अनुभवी स्पिनर नॅथन लायनने एका डावात तब्बल ८ विकेट्स घेत भारतीय फलंदाजांना घाम फोडला आणि भारतात येऊन दिग्गज स्पिनर अनिल कुंबळेचा विक्रम मोडला.
पहिल्या दोन कसोटीत फिरकीचा जो डाव भारताने आखला होता तो इंदूरमध्ये भारतावरच उलटला. इंदूर कसोटीच्या दोन दिवसांतच ऑस्ट्रेलियाने भारताला पराभवाच्या मार्गावर ढकलले असून त्यात त्यांचा स्टार ऑफ स्पिनर नॅथन लायनचा मोठा वाटा आहे. अनुभवी फिरकीपटू लायनने दुसऱ्या डावात ८ विकेट घेत टीम इंडियाला घाम फोडला. यासोबत त्याने मोठा विक्रमही मोडला. ३५ वर्षीय लायनने पहिल्या डावात ३ तर दुसऱ्या डावात ८ बळी घेतले. या सामन्यातील या ११ विकेट्ससह लायन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज बनला. त्याने अनिल कुंबळेचा विक्रम मोडीत काढला. लायनच्या नावावर आता २५ कसोटी सामन्यात ११३ विकेट्स आहेत. अशाप्रकारे, त्याने महान भारतीय लेग-स्पिनर अनिल कुंबळेचा विक्रम मोडला, ज्याने २००८ मध्ये निवृत्तीच्या वेळी १११ बळी घेऊन हा विक्रम केला होता.
१०६ विकेट्स घेणाऱ्या भारताचा दिग्गज रविचंद्रन अश्विन सोबत सध्या लायनची स्पर्धा सुरू आहे. लायनने या डावात ६४ धावांत ८ बळी घेतले. ही त्याची कसोटी क्रिकेटमधील दुसरी सर्वोत्तम कामगिरी आहे. ऑस्ट्रेलियन दिग्गज खेळाडूकडे एका डावात ८/५० अशी सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याने २०१७ मध्ये भारताविरुद्ध बंगळुरू कसोटीत ही कामगिरी केली होती. या मालिकेतही नॅथन लायन चमकदार कामगिरी करत आहे. त्याच्या नावावर आतापर्यंत ५ डावांत १९ विकेट्स आहेत. त्यात २ वेळा एका डावात ५ पेक्षा जास्त विकेट्स आहेत. त्याच्यापुढे फक्त रवींद्र जाडेजा आहे. त्याने ५ डावात २१ बळी घेतले आहेत.