IND vs AUS 3rd Test, Sunil Gavaskar: नागपूर आणि दिल्लीत भारताने पराभव केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने इंदूरच्या तिसऱ्या कसोटीत शानदार पुनरागमन केले. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे आणि अहमदाबादमध्ये एक कसोटी सामना खेळायचा आहे. या विजयानंतर भारतीय माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी एक विधान केले होते. या विधानाला खोडून काढत, ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू मार्क टेलरने (Mark Taylor) त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. टीम इंडियावर निशाणा साधत त्यांनी, भारतीय संघाला 'फसवणूक करणारा' असल्याचे म्हटले आहे. टेलरने आतापर्यंत कसोटी मालिकेतील तीनही पिचबद्दल कमालीची नाराजी व्यक्त केली. तसेच अशी खेळपट्टी तयार करण्यात काही प्रमाणात फसवणूक झाली असल्याचा आरोप केला.
पिचबद्दल गावसकर काय म्हणाले?
नागपूर आणि नवी दिल्लीच्या खेळपट्ट्यांना आयसीसीने सरासरी (Average) रेट केले होते, पण इंदूरच्या खेळपट्टीला सामनाधिकारी ख्रिस ब्रॉड यांनी खराब (poor) रेट केले. या खराब रेटिंगमुळे इंदूरला तीन डिमेरिट पॉइंट मिळाले असून हे गुण पाच वर्षे राहतील. सुनील गावस्कर मात्र इंदूरच्या खेळपट्टीला मिळालेल्या खराब रेटिंगमुळे खूश नाहीत. त्यांनी गाबाच्या खेळपट्टीचे उदाहरण दिले, जिथे डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिली कसोटी दोन दिवसाच्या आत संपली तरीही आयसीसीने त्या पिचला केवळ सरासरीपेक्षा वाईट (below average) रेट केले होते. भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील पहिल्या तीन कसोटी सामन्यांपेक्षा ब्रिस्बेनची गाब्बा खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच होती, असे सांगून टेलरने त्यांच्याशी असहमती व्यक्त केली आणि त्यांनी प्रत्युत्तर दिले.
टेलर काय म्हणाले?
इंदूरच्या खेळपट्टीच्या रेटिंगबद्दल बोलताना टेलर म्हणाले, "मी या रेटिंगशी सहमत आहे. या मालिकेसाठीच्या सर्वच खेळपट्ट्या पूर्णपणे वाईट आहेत. इंदूरची खेळपट्टी तिघांपैकी सर्वात वाईट होती. पहिल्या दिवसापासून खेळपट्टीवर फिरकीपटूंना इतकी मदत मिळावी, असे मला वाटत नाही. जर सामन्याच्या चौथ्या किंवा पाचव्या दिवशी असे घडले तर गोष्टी समजू शकतात. पण पहिल्या दिवसापासूनच चेंडू इतका टर्न घेत असेल तर तो खराब (खेळपट्टी) तयार केल्याचा परिणाम आहे."
गावसकरांना प्रत्युत्तर
"गाबाच्या खेळपट्टीवर दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना तितकीच मदत मिळाली, कारण त्यांच्याकडे चार अतिशय चांगले वेगवान गोलंदाज होते. भारतीय खेळपट्ट्यांच्या बाबतीत असे नाही. येथे अशा खेळपट्ट्या चलाखीने तयार करण्यात आल्या आहेत, ज्यात फिरकीपटूंनाच फायदा आहे. त्यामुळे आमच्या फिरकीपटूंना त्यांचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळाली आणि त्यांनी भारताच्या अपेक्षेपेक्षा वेगळीच कामगिरी केली आणि सामना जिंकला," असे टेलर यांनी गावसकरांना उत्तर दिले.