मेलबर्न, भारत विरुद्घ ऑस्ट्रेलिया : भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराने बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशीही सातत्यपूर्ण कामगिरीचे सत्र कायम राखले. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात सहा विकेट घेणाऱ्या बुमराने दुसऱ्या डावात पहिल्या चार फलंदाजांमध्ये दोन विकेट टिपल्या. शॉन मार्शला पायचीत करून बुमराने पदार्पणाच्या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याने दोन विकेट घेत कपिल देव, आणि अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. यासह त्याने 33 वर्षांपूर्वीचा रवी शास्त्रींचा विक्रमही मोडला.
भारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचे चार फलंदाज 114 धावांवर माघारी परतले. यात बुमराने दोन विकेट घेतल्या. बुमराने या दोन विकेटसह या कसोटीत मिळून आठ विकेट घेतल्या. कारकिर्दीत प्रथमच बुमराने एका सामन्यात आठ विकेट घेतल्या आहेत. बुमराने पहिल्या डावात 6 विकेट घेतल्या होत्या. या कामगिरीसह त्याने कपिल देव व अजित आगरकर यांच्या विक्रमाशीही बरोबरी केली. कपिल देव यांनी 1985 व 1992 साली अॅडलेड कसोटीत अनुक्रमे 8/109 आणि 8/163 अशा कामगिरीची नोंद केली होती. त्यानंतर आगरकरने 2003 मध्ये अॅडलेड येथेच 8/160 अशी कामगिरी केली. आज बुमराने मेलबर्नवर आतापर्यंत 8/51 अशी कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलियात भारताच्या एकाही जलदगती गोलंदाजांला कसोटीत दहा विकेट घेता आलेल्या नाहीत आणि बुमराला हा विक्रम नोंदवण्याची संधी आहे.