IND vs AUS 3rd Test Live Updates: दोन सामन्यात पराभव स्वीकारलेल्या ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या सामन्यात जोरदार कमबॅक केला. इंदूर येथील तिसऱ्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी भारतीय फलंदाजांना सळो की पळो करून सोडले. मॅथ्यू कुन्हेमनच्या ५ विकेट्स आणि नॅथन लायनच्या ३ बळींच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताचा पहिला डाव १०९ धावांवर गुंडाळला. भारताकडून कोणताही फलंदाज तिशीही पार करू शकला नाही. रोहित शर्मापासून ते विराट कोहलीपर्यंत दिग्गज फलंदाज केवळ हजेरी लावून गेले. उमेश यादवने थोडीशी फटकेबाजी करून संघाला शंभरी पार करून दिली. पण ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांना फारशी मोकळी मिळू दिली नाही.
--
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. तो निर्णय पूर्णपणे फसला. सहाव्या षटकांतच रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला. त्यानंतर शुबमन गिल २१ धावा काढून माघारी परतला. चेतेश्वर पुजाराही १ धावा काढून त्रिफळाचीत झाला. मग लायनने ११व्या षटकात जाडेजाला झेलबाद केले. कुहनेमनने जाडेजाचा अफलातून झेल घेतला. श्रेयस अय्यरही शून्यावर बाद झाला. निम्मा संघ ४५ धावांत बाद झाला. पाठोपाठ विराट कोहली २२ धावांवर बाद झाला आणि केएस भरत १७ धावा काढून पायचीत झाला. त्यामुळे लंचपर्यंत भारताची अवस्था ७ बाद ८४ झाली. त्यामुळे भारत शंभरी गाठणार की नाही, याचीच भीती होती.
लंचनंतर दुसऱ्या सत्रात अक्षर पटेल आणि अश्विनने संथ खेळ सुरू केला. पण अश्विन ३ धावांवर माघारी परतला. उमेश यादवने थोडीशी रंगत आणली. त्याने मर्फीच्या गोलंदाजीवर १ चौकार आणि २ षटकार मारत १७ धावा केल्या. त्याच्यामुळेच भारताने शंभरी गाठली. पण नंतर तो बाद झाला. आणि धाव चोरण्याच्या नादात मोहम्मद सिराजही रन आऊट झाला. त्यामुळे भारताचा डाव १०९ धावांवर आटोपला.