India vs Australia 3rd Test: बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या सामन्यासाठी आठवडाभराचा अवधी आहे, मात्र ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणी कमी होण्याचे नाव घेत नाहीत. ऑस्ट्रेलियाला एकामागून एक धक्के बसत आहेत, त्यामुळे संघ बॅकफूटवर गेला आहे. ऑस्ट्रेलियन संघातील अनेक मोठे खेळाडू दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडत आहेत. अशा परिस्थितीत तिसऱ्या कसोटीपूर्वी आणखी एक बातमी समोर आली आहे ज्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या अडचणी आणखी वाढणार आहेत. ही बातमी इंदूरमध्ये १ मार्चपासून होणाऱ्या IND vs AUS तिसऱ्या कसोटीशी संबंधित आहे.
टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला पुन्हा रडवणार?
तिसऱ्या कसोटीपूर्वी पहिल्या दोन सामन्यांमध्ये जशी खेळपट्टी खेळायला मिळाली तशी खेळपट्टी तिसऱ्या सामन्यात खेळायला मिळू नये, अशी ऑस्ट्रेलियाची इच्छा आहे. तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला दिल्ली आणि नागपूरसारख्या खेळपट्ट्या मिळाल्या तर ऑस्ट्रेलियाचा पराभव जवळपास निश्चित आहे. भारताची फिरकी जोडी रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जाडेजा यांनी ऑस्ट्रेलियन फलंदाजांना अडचणीत टाकले आहे. स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबूशेन, डेव्हिड वॉर्नर यांच्यासारेख अनुभवी खेळाडूही खेळताना बाचकताना दिसले आहेत. त्यातच आता अशी बातमी समोर येत आहे की इंदूरमध्ये होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी लाल मातीची खेळपट्टी तयार केली जात आहे. हे ऐकून ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची डोकेदुखी नक्कीच वाढू शकते. लाल मातीची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. मात्र, फिरकीसोबतच ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते.
लाल मातीच्या खेळपट्टीचे वैशिष्ट्य काय आहे? मुंबईचा संबंध काय?
इंदूर कसोटीसाठी लाल मातीची खेळपट्टी तयार केली जात असून, त्यासाठी मुंबईहून माती आणण्यात आली आहे. लाल मातीची खेळपट्टी फिरकी गोलंदाज तसेच वेगवान गोलंदाजांसाठी उपयुक्त ठरते. अशा खेळपट्ट्यांवर फलंदाजी करणे देखील सोपे आहे, परंतु पहिल्या दोन कसोटी सामन्यांच्या दृष्टिकोनातून ऑस्ट्रेलियाचे फलंदाज भारतीय गोलंदाजांना खेळण्यात पूर्णपणे अपयशी ठरत आहेत. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला येथेही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. या सामन्यात एकूण नऊ खेळपट्ट्या बनवल्या जाणार असून त्यात एक खेळपट्टी लाल मातीचीही असणार आहे.
इंदूरमध्ये भारत अजिंक्य!
होळकर स्टेडियमवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघ अजिंक्य आहे. इंदूरमध्ये भारताने आजपर्यंत एकही कसोटी सामना गमावलेला नाही. भारताने येथे दोन कसोटी सामने खेळले आहेत. २०१६ मध्ये येथे पहिला कसोटी सामना खेळला गेला होता, ज्यामध्ये न्यूझीलंडला ३२१ धावांनी मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. तर दुसरा सामना २०१९ मध्ये खेळला गेला होता. त्यामध्ये बांगलादेशचा एक डाव आणि १३० धावांच्या मोठ्या फरकाने पराभव झाला होता. अशा परिस्थितीत ऑस्ट्रेलियासाठी हा सामना कसोटीच असणार आहे.
Web Title: IND vs AUS 3rd test match india vs australia indore test pitch holkar stadium border gavaskar trophy india records
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.