मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ नव्या जोडीने मैदानावर उतरला. मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारतीय संघाला सकारात्मक सुरुवात करुन दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी संयमी खेळ करताना 40 धावा जोडल्या. मात्र हनुमा माघारी परल्यानंतर मयांकने सामन्याची सुत्रे हातात घेतली. पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या मयांकच्या चेहऱ्यावर कोणतेही दडपण दिसत नव्हते. त्याने पदार्पणात अर्धशतक झळकावताना 71 वर्षांपूर्वीचा दत्तू फडकर यांचा विक्रम मोडला.
पॅट कमिन्सने ही भागीदारी संपुष्टात आणली. मयांकने मात्र आत्मविश्वासाने खेळ करताना पदार्पणात अर्धशतक झळकावले. त्याने खणखणीत चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. परदेशात पदार्पणात एकाही भारतीय सलामीवीराला शतक झळकावता आलेले नाही आणि मयांक हा पराक्रम करेल, अशी आशा आहे. 48 धावांवर असताना मयांकने चौकार खेचून अर्धशतक पूर्ण केले. ऑस्ट्रेलियात पदार्पणात सर्वाधिक धावांचा विक्रम त्याच्या नावावर जमा झाला आहे. याआधी हा विक्रम दत्तू फडकर यांच्या नावावर होता. त्यांनी 1947साली झालेल्या सिडनी कसोटीत पदार्पणात 51 धावा केल्या होत्या. मयांकने 71 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.