मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात मेलबर्न येथे सुरू झालेल्या तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवालने पहिला दिवस गाजवला. त्याने 76 धावांची खेळी करताना कसोटीत दणक्यात पदार्पण केले. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या कॉमेंटेटरला मयांकच्या या खेळीमुळे प्रचंड मनस्ताप झाला आणि त्याने चालू कार्यक्रमात मयांकचा अपमान केला. ऑस्ट्रेलियाचा कॉमेंटेटर कैरी ओ कीफने मयांकवर टीका करताना असे भाष्य केले, की ज्याने भारताच्या स्थानिक क्रिकेटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
कीफ हा मेलबर्न कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर चर्चा करत असताना मयांकविषयी बोलत होता. फॉक्स स्पोर्ट्सवर त्याच्यासोबत दिग्गज फिरकीपटू शेन वॉर्न आमि मार्क होवार्ड हेही होते. या चर्चेत कीफ यांनी भारताच्या स्थानिक क्रिकेट स्पर्धांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला. मयांकने स्थानिक क्रिकेटमध्ये केलेली 300 धावांची खेळी ही कँटींग कर्मचारी किंवा वेटर यांच्याविरुद्ध केली होती, असे आक्षेपार्ह विधान कीफने केले.
मयांकने स्थानिक क्रिकेटमध्ये खोऱ्याने धावा केल्या आहेत. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2013 साली झारखंडविरुद्ध पदार्पण केले. मयांकने लिस्ट A क्रिकेटमध्ये 75 सामन्यांत 48.71च्या सरासरीने आणि 100.72च्या स्ट्राइक रेटने 3605 धावा केल्या आहेत. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 46 सामन्यांत 78 डावांमध्ये 49.98च्या सरासरीने 3599 धावा केल्या आहेत. 2017-18च्या मोसमात त्याने स्थानिक स्पर्धेत 2141 धावा केल्या आहेत आणि त्या सत्रात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत तो आघाडीवर होता. त्याने 2017 मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये महाराष्ट्रविरुद्ध 304 धावांची खेळी केली होती. कीफच्या त्या विधानाचा नेटिझन्सने चांगलाच समाचार घेतला.