ठळक मुद्दे बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ नव्या जोडीने मैदानावर उतरला.मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारीची सकारात्मक सुरुवातमयाकं अग्रवालचे पदार्पणात अर्धशतक
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : बॉक्सिंग डे कसोटीत भारतीय संघ नव्या जोडीने मैदानावर उतरला. लोकेश राहुल आणि मुरली विजय यांचा अपयशाचा पाढा कायम राहिल्याने त्यांना तिसऱ्या कसोटीत नारळ देण्यात आला. त्यामुळे मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी या जोडीला संधी मिळाली. या सामन्यातून मयांकने कसोटीत पदार्पण केले. ऑस्ट्रेलियाच्या तिखट माऱ्याचा सामना करताना मयांकने आक्रमक आणि हनुमाने संयमी सुरुवात केली. या नव्या जोडीने पहिल्याच सामन्यात पराक्रम गाजवला. मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम 11 सदस्यांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. त्यात राहुल आणि विजय या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या जागी संघात मयांक आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे. पण, मयांक बरोबर डावाची सुरुवात करणार कोण हा पेच कायम होता आणि हनुमाच्या रुपाने तो सुटला. पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवून मालिकेत जोरदार कमबॅक केले. 1-1 अशा बरोबरीत असलेली ही मालिका बॉक्सिंग डे कसोटीत रंगतदार होणार आहे.
2018 मध्ये भारताकडून पदार्पण करणारा मयांक हा सहावा खेळाडू ठरला. याच वर्षी जसप्रीत बुमरा, रिषभ पंत, हनुमा, पृथ्वी शॉ आणि शार्दूल ठाकूर यांनी कसोटीत पदार केले. 2011 नंतर प्रथमच हा योग जुळून आला. 2011 मध्येही सहा खेळाडूंनी भारताच्या कसोटी संघात पदार्पण केले होते. विराट कोहली, प्रविण कुमार, आर अश्विन, अभिनव मुकुंद, उमेश यादव आणि वरुण आरोन हे ते पदार्पणवीर होते. पदार्पणाच्या सामन्यात मयांकने आपल्या खेळीचा दर्जा दाखवला. त्याने ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजीवर प्रहार केला, तर हनुमा संयमी खेळ करत होता. 19 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर ही भागीदारी संपुष्टात आली. पॅट कमिन्सने हनुमाला बाद केले. भारताला 40 धावांवर पहिला धक्का बसला. पण या नव्या जोडीने पराक्रम केला. 2011 नंतर सर्वाधिक चेंडूंचा सामना करणारी ही पहिलीच जोडी ठरली. परदेशात प्रामुख्याने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यावर 2011 नंतर भारताच्या सलामीच्या जोडीला इतका वेळ खेळपट्टीवर तग धरताच आली नव्हती. मयांक व हनुमा या जोडीने ते केले.