मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑसी कर्णधार टीम पेन याच्या यष्टिमागून सुरू असलेल्या शेरेबाजीवर नेटिझन्ससोबत मुंबई इंडियन्सही एकवटले आहेत. पेनने बॉक्सिंग डे कसोटी कामगिरीने नव्हे तर शेरेबाजीने गाजवली. त्यामुळे त्याच्यावर सोशल मीडियावर चांगलीच टीका होताना दिसत आहे. पेनने मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा फलंदाजी करत असताना शेरेबाजी केली होती. रोहितने सामन्याच्या तिसऱ्या दिवसानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यावर उत्तर दिले आणि पेनला चॅलेंज दिले. मुंबई इंडिनन्सनेही पेनचा समाचार घेतला होता. चौथ्या दिवशी पेन बाद होताच मुंबई इंडियन्सने ट्विट करून पेनला खोचक टोमणा हाणला.
कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पेनने यष्टिमागून रोहित शर्माला शेरेबाजी मारण्यास सुरुवात केली. रोहितचे लक्ष विचलित करून त्याला बाद करण्याचा डाव पेनने आखला. तो सतत रोहितला डिवचत होता. तो रोहितला म्हणत होता की, तु जर षटकार खेचलास तर मी मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास तयार होईन. रोहितने त्याला प्रत्युत्तर देणे टाळले, परंतु मुंबई इंडियन्सने त्याला चांगचेच उत्तर दिले होते. त्यानंतर रोहितने पत्रकार परिषदेत पेनला चॅलेंज दिले. रोहित म्हणाला होता की,'पेनने शतक ठोकले तर मी अंबानीशी बोलेन आणि तुला संघात घेईन.'