मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न येथे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघाने अंतिम 11 खेळाडूंची नावे जाहीर केली. लोकेश राहुल व मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना डच्चू देण्यात आला आहे. या सामन्यात मयांक अग्रवाल आंतरराष्ट्रीय कसोटीत पदार्पण करणार आहे. त्याचे सलामीचे स्थान पक्के असले तरी त्याच्या जोडीला कोणाला संधी मिळेल, हे उद्याच ठरेल. मयांकसोबत सलामीला हनुमा विहारी आणि रोहित शर्मा यांची नावे चर्चेत आहेत.
राहुल आणि विजय यांना या मालिकेत पहिल्या दोन सामन्यांत मिळून 95 धावाच करता आल्या आहेत. त्याशिवाय या जोडीने मागील अकरा डावांमध्ये 15 च्या सरासरीने 166 धावा केल्या आहेत. यात केवळ एकच अर्धशतकी भागीदारी केली आहे. त्यामुळे त्यांना अखेरीस डच्चू देण्यात आला. त्यामुळे मयांक व विहारी तिसऱ्या कसोटीत भारताच्या डावाची सुरुवात करतील असा अंदाज आहे. रोहित शर्मा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येईल, परंतु नेटिझन्सने रोहित आणि मयांक यांनी सलामीला यावे अशी डिमांड केली आहे.
भारतीय संघ : विराट कोहली, अजिंक्य रहाणे, मयांक अग्रवाल, हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, रोहित शर्मा, रिषभ पंत, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमरा.