ठळक मुद्देभारताने दुसरा डाव 8 बाद 106 धावांवर घोषितऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे आव्हानमेलबर्नच्या खेळपट्टीचा लहरी स्वभाव भारताच्या बाजूनं
मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटीत यजमान ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी 399 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झालेली आहे. गोलंदाजीला पोषक असलेल्या या खेळपट्टीवर फलंदाजांची चांगलीच कसोटी पणाला लागत आहे. त्यामुळे 399 धावांचे लक्ष्य सोपं नाही आणि मेलबर्न कसोटीचा 90 वर्षांचा इतिहासही हेच सांगतो.
भारतीय संघाने कालच्या 5 बाद 54 धावसंख्येवरुन चौथ्या दिवसाची सुरुवात केली. तिसऱ्या दिवसाच्या शेवटच्या सत्राप्रमाणे भारतीय फलंदाज अपयशी ठरतील असे वाटले होते. मात्र मयांक अग्रवाल आणि रिषभ पंत यांनी खेळपट्टीवर तग धरला. त्यांनी सहव्या विकेटसाठी 39 धावांची भागीदारी केली. मयांक 42 आणि पंत 33 धावांवर माघारी फिरला. कर्णधार कोहलीने 8 बाद 106 धावांवर डाव घोषित करून ऑस्ट्रेलियासमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले.
मेलबर्नची खेळपट्टीपाहता ऑस्ट्रेलियाला हे लक्ष्य पार करणे तितके सोपे नाही. दोन दिवसांच्या खेळात 167 षटकं खेळणे हे कांगारूसाठी आव्हानात्मक आहे. त्यात येथील कसोटी इतिहासही हेच सांगतो. चौथ्या डावात येथे धावांचा पाठलाग करणे कठीण आहे. आतापर्यंत 24 वेळा धावांचा पाठलाग करणारा संघ अपयशी ठरला आहे आणि केवळ चार सामने अनिर्णीत राहिली आहेत. येथे इंग्लंडने 1928 साली मिळवलेला विजय हा आतापर्यंत येथे सर्वाधिक धावांचा पाठलाग ठरला आहे. इंग्लंडने 332 धावांचा यशस्वी पाठलाग केला होता.