मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : माजी गोलंदाज मिचेल जॉन्सन निवृत्तीनंतर सोशल मीडियावर अधिक सक्रीय असतो. त्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या मालिकेत त्याचा सोशल मीडियावर वावर वाढलेला दिसत आहे. त्यातही तो भारताविरुद्ध जास्तच गरळ ओकत आहे. त्याच्या प्रत्येक टीकेवर नेटिझन्स उत्तर देतच आहेत, परंतु शनिवारी रवींद्र जडेजाने त्याचा समाचार घेतला. जडेजाने टीका करून नाही तर आपल्या कामगिरीने जॉन्सनला उत्तर दिले.
भारताच्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. त्यांचे सहा फलंदाज 157 धावांवर माघारी परतले आहेत आणि विजयासाठी त्यांना आणखी 242 धावा करायच्या आहेत. भारत विजयाच्या उंबरठ्यावर आला असून दूसऱ्या डावात आतापर्यंत जसप्रीत बुमरा आणि जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या आहेत. जडेजाने मिचेल मार्शला बाद करून कसोटीत 189 विकेटचा पल्ला गाठला. या कामगिरीसह त्याने इरापल्ली प्रसन्ना यांच्या विक्रमाशी बरोबरी केली. पण प्रसन्ना यांना 189 विकेटसाठी 49 कसोटी सामने खेळले आणि जडेजाने केवळ 40 कसोटींत हा पराक्रम केला.