मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारताच्या पहिल्या डावातील 443 धावांचा पाठलाग करताना यजमान ऑस्ट्रेलियाची तारांबळ उडाली आहे. त्यांच्यावर फॉलोऑनचे सावट घोंगावू लागले आहेत. त्यांचे सहा फलंदाज अवघ्या 102 धावांवर माघारी परतले आहेत. या सामन्यात जसप्रीत बुमरा आपल्या वैविध्यपूर्ण गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधत आहे. त्यात रवींद्र जडेजाने सामन्याच्या तिसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाविरुद्ध बळींचे अर्धशतक पूर्ण केले.
इशांत शर्माने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने अॅरोन फिचला माघारी पाठवले. त्यानंतर बुमरा आणि जडेजा यांनी अनुक्रमे ट्रॅव्हिस हेड आणि उस्मान ख्वाजाचा अडथळा दूर केला. ही जोडी भारतासाठी डोकेदुखी ठरेल असे वाटत होते, परंतु त्यांना वेळीच माघारी पाठवण्यात गोलंदाजांना यश आले. जडेजाने ख्वाजाची विकेट घेत एक पराक्रम केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही त्याची 50 वी विकेट ठरली. त्यात त्याने आणखी एका विकेटची भर घातली. त्याने मिचेल मार्शलाही बाद केले. तंदुरुस्तीचे कारण देऊन जडेजाला दुसऱ्या कसोटीत बाकावर बसवण्यात आले होते. त्यावरून प्रचंड टीकेचा मारा झाला. पण, मेलबर्न कसोटीत त्याला सहभागी करण्यात आले आणि त्याने निवड सार्थ ठरवली.