मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रिषभ पंतने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत यष्टिमागे दमदार कामगिरी करताना बॉक्सिंग डे कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विक्रमाची नोंद केली. शुक्रवारी त्याने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार टीम पेनचा झेल टिपला. या मालिकेतील त्याचा हा 18वा झेल ठरला आणि एका मालिकेत सर्वाधिक झेल टिपणाऱ्या भारतीय यष्टिरक्षकाचा विक्रम त्याने स्वतःच्या नावावर केला.
पंतने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात तीन कसोटी सामन्यांत 18 झेल टिपले आहेत. त्याने या कामगिरीसह सय्यद किरमानी आणि महेंद्रसिंग धोनी यांचा विक्रम मोडला. दोघांनी प्रत्येकी 17-17 झेल टिपले होते. मुख्य म्हणजे किरमानी यांना 17 झेलसाठी 6 कसोटी सामन्यांची मालिका खेळावी लागली होती. धोनीने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 17 झेल पकडले. पंतने केवळ तीन सामन्यांत हा पराक्रम केला.