मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : चेतेश्वर पुजारा (106) आणि कर्णधार विराट कोहली (82) यांनी उभ्या केलेल्या डोलाऱ्याच्य जोरावर भारताने पहिल्या डावात 7 बाद 443 धावांचा डोंगर उभा केला. कसोटीत कमबॅक करणाऱ्या रोहित शर्माने (63*) अर्धशतकी खेळी करून चाहत्यांना खूश केले. भारताने चार वर्षांनंतर प्रथमच ऑस्ट्रेलियात एका डावात चारशेपेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रोहित नाबाद असतानाही डाव घोषित करण्याचा कोहलीचा निर्णय काहींना पटला नाही. मात्र, रोहितला नाबाद असतानाच डाव घोषित करण्यामागे एक कारण दडल आहे.
मयांक अग्रवालने सकारात्मक सुरुवात केल्यानंतर पुजारा आणि कोहली यांनी 170 धावांची भागीदारी करून संघाला तीनशे पर्यंत पोहोचवले. त्यानंतर रोहितने अजिंक्य रहाणे आणि रिषभ पंत यांच्यासोबत आक्रमक खेळ करताना संघाला चारशेहून अधिक धावा उभारून दिल्या. रोहितने चौथ्या विकेटसाठी अजिंक्यसोबत 62 आणि पाचव्या विकेटसाठी पंतसोबत 76 धावांची भागीदारी केली. या दरम्यान रोहितने आपले अर्धशतकही पूर्ण केले. रहाणे आणि पंत बाद झाल्यानंतर रोहित मोठी फटकेबाजी करून संघाच्या खात्यात आणखी 50-75 धावा जोडेल अशी अपेक्षा होती. मात्र रवींद्र जडेजा बाद होताच कोहलीने डाव घोषित केला. रोहित फॅन्स या निर्णयाने निराश झाले, परंतु त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
रोहित मैदानावर असताना डाव घोषित करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी चारवेळा रोहित 50 पेक्षा अधिक धावांवर खेळत असताना भारताने डाव घोषित केला आहे. रोहितच्या या चार खेळीत न्यूझीलंडविरुद्धच्या ( 68* व 51* साल 2016) दोन आणि श्रीलंकेविरुद्धच्या ( 50* साल 2017) एका खेळीचा समावेश आहे. आनंदवार्ता पुढे आहे. कसोटी क्रिकेटमध्ये रोहित जेव्हाजेव्हा नाबाद rराहिला आहे, तेव्हा भारताने सामना गमावलेला नाही. रोहित आतापर्यंत सहावेळा नाबाद राहिला आहे आणि त्यापैकी भारताने चार सामने जिंकले आहेत, तर दोन सामने अनिर्णीत राहिले.