मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पराभव डोळ्यासमोर दिसताच ऑस्ट्रेलियाचे खेळाडू शाब्दिक शेरेबाजी करून प्रतिस्पर्धी संघाचे लक्ष विचलित करण्याचा रडीचा डाव करतात. बॉक्सिंग डे कसोटीतही तसेच चित्र पाहायला मिळत आहे. भारतीय खेळाडूंना जाणीवपूर्वक टार्गेट केले जात असून ऑसी खेळाडू शेरेबाजी करत आहे. खेळाडूंच्या या रडीच्या डावात चाहत्यांनीही सहभाग घेतला आहे. मेलबर्न कसोटीत भारताचे पारडे जड असल्याचे दिसताच चाहत्यांनी खेळाडूंवर वर्णद्वेषी केली. एका इंग्रजी वेबसाईटने हा दावा केला आहे आणि त्यांच्याकडे याबाबतचा पुरावा आहे. त्यांनी तो पुरावा क्रिकेट ऑस्ट्रेलियाला दिला आहे.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने हा पुरावा व्हिक्टोरिया पोलीस आणि स्टेडियमच्या व्यवस्थापकांना पाठवला आहे. मेलबर्न स्टेडियमच्या ग्रेट सदर्न स्टँड्सचा एका भागातील दर्शक भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी टीका करताना दिसत आहेत. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने त्याची गंभीर दखल घेतली असून दर्शकांना ताकीद दिली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले की,''व्हिक्टोरिया पोलीस आणि स्टेडियमचे सुरक्षा विभाग चाहत्यांवर लक्ष ठेवणार आहेत. त्यांना नियमांची जाण करून देण्यात येणार आहे. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यास त्यांना स्टेडियमबाहेर काढण्यात येईल.''
जसप्रीत बुमराच्या कमालीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारतीय संघाने पहिल्या डावात 292 धावांची आघाडी घेतली. मात्र, फॉलोऑन न देता पुन्हा फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय भारताच्या अंगलट आल्याचे चित्र आहे. तिसऱ्या दिवसअखेर भारताने 346 धावांची आघाडी घेतली, परंतु त्यांचे 5 फलंदाज माघारी परतले आहेत.