मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया :चव्या दिवसातील पहि बॉक्सिंग डे कसोटीच्या पाले सत्र पावसामुळे वाया गेली. ऐतिहासिक विजयापासून दोन विकेट दूर असलेल्या भारताला पावसाने बरीच प्रतीक्षा करायला लावली. ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सनेही खिंड लढवत भारताचा विजय लांबणीवर टाकला. मात्र, पाऊस थांबला आणि भारताने शेवटचे दोन बळी टिपून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. या विजयाबरोबर विराट सेनेने 41 वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी केली. जसप्रीत बुमराने दोन्ही डावांत मिळून एकूण 9 विकेट घेतल्या. त्याने पहिल्या डावात 6 आणि दुसऱ्या डावात 3 बळी टिपले.
या मालिकेतील पहिलाच सामना जिंकून भारतीय संघाने इतिहास घडविला. ऑस्ट्रेलियात प्रथमच भारताला कसोटी मालिकेतील सलामीचा सामना जिंकता आला. मात्र दुसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने कमबॅक केले आणि पर्थवर विजय मिळवून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली. मेलबर्नवर भारताने त्याचे चोख प्रत्युत्तर दिले.
चेतेश्वर पुजाराचे शतक आणि मयांक अग्रवाल, विराट कोहली व रोहित शर्मा यांच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने पहिला डाव 443 धावांवर घोषित केला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर गुंडाळून भारतीय संघाने मजबूत आघाडी घेतली. त्यात आणखी 106 धावांची भर घालून भारताने यजमानांसमोर 399 धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात कमिन्स वगळता ऑसी खेळाडूंना फारकाळ खेळपट्टीवर टिकता आले नाही.