मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी यांनी भारताला तिसऱ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध भक्कम सुरुवात करून दिली. हनुमा बाद झाल्यानंतर मयांकने दुसऱ्या विकेटसाठी चेतेश्वर पुजारासोबत भारताच्या धावांचा वेग कायम राखला. मयांकने कसोटी पदार्पणात 76 धावांची खेळी साकारताना अनेक विक्रम मोडले. मयांकच्या या खेळीने भारताला सलामीला योग्य पर्याय सापडला अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मयांकच्या झंझावातानंतर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली यांनी भारताची मजबूत स्थिती कायम राखली. कोहलीने या सामन्यात एका विक्रमाला गवसणी घातली. त्याने माजी कसोटीपटू व्ही व्ही एस लक्ष्मणचा विक्रम मोडला.
भारताने तिसऱ्या कसोटीत मयांक अग्रवाल आणि हनुमा विहारी ही नवी जोडी सलामीला उतरवली. दोघांनी भारताला सकारात्मक सुरुवात करून दिली. मयांकने पदार्पणातच आपलं नाणं खणखणीत वाजवून निवड समितीला प्रभावित केले. त्याची 76 धावांची खेळी पॅट कमिन्सने संपुष्टात आणली. ऑस्ट्रेलियात पदार्पणात सलामीवीराने केलेली ही सर्वोत्तम खेळी ठरली. त्याने या खेळीसह 71 वर्षांपूर्वीची दत्तू फडकर यांचा विक्रम मोडला. मयांक माघारी परतल्यानंतर कोहली मैदानावर आला आणि स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट केला.
कोहलीने तिसऱ्या विकेटसाठी पुजारासह अर्धशतकी भागीदारी केली. त्याने 25 धावा करताच एक विक्रम नावावर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये मिळून सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये कोहलीने दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. कोहलीने या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर असलेल्या लक्ष्मणला मागे टाकले. या क्रमवारीत सचिन तेंडुलकर 6707 धावांसह आघाडीवर आहे.