मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मेलबर्न कसोटीत विजय मिळवून विराट कोहलीने परदेशात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधाराच्या विक्रमाशी बरोबरी केली. परदेशातील कोहलीचा कर्णधार म्हणून हा 11 वा विजय ठरला आणि त्याने माजी कर्णधार सौरव गांगुलीच्या विक्रमाशी बरोबरी केली. गांगुलीला हे 11 विजय मिळवण्यासाठी 28 कसोटी सामने खेळावे लागले, तर कोहलीने 24 सामन्यांत हा पराक्रम केला. तसेच ऑस्ट्रेलियात 41 नंतर प्रथमच भारताने मालिकेत दोन सामने जिंकण्याचा पराक्रम केला. या विजयामुळे कोहली खूपच आनंदी झाला आणि त्याने सामन्यानंतर एका छोट्या चाहत्याला खास भेट दिली.
भारताने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 261 धावांवर माघारी परतला. जसप्रीत बुमरा आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमी व इशांत शर्मा यांनीही प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले. भारताने 137 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियात 2-1 अशी आघाडी घेणारा कोहली पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे. सामन्यानंतर कोहलीने स्टेडियमवर भारतीय संघाला पाठींबा देणाऱ्या प्रत्येकाचे आभार मानले.
कर्णधार म्हणून कोहलीचा हा 26 वा कसोटी विजय आहे. या क्रमवारीत महेंद्रसिंग धोनी 27 विजयांसह आघाडीवर आहे.