मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : पर्थ कसोटीत विजय मिळवून ऑस्ट्रेलियाने मालिकेत बरोबरी साधली. हा सामना भारताच्या निराशाजनक कामगिरीने चर्चेत राहिलाच, परंतु कर्णधार विराट कोहली आणि टीम पेन यांच्यात झालेल्या शेरेबाजीने सामन्याला वेगळे वळण दिले. दोन्ही संघांतील खेळाडू एकमेकांना टोमणे मारता दिसले. कोहलीच्या आक्रमक पवित्र्यावर अनेकांनी टीका केली, तर काहींनी कोहलीचे वागणं योग्य असल्याचं सांगितलं. त्यामुळे बुधवारपासून सुरू होणाऱ्या तिसऱ्या कसोटीत कोहलीचा हाच अवतार पाहायला मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा आहे. मात्र, कोहलीने मेलबर्न कसोटीसाठी नवा गेम प्लॅन आखल्याचे सांगितले आहे.
तिसऱ्या कसोटीसाठी भारताच्या अंतिम 11 सदस्यांची मंगळवारी घोषणा करण्यात आली. बॉक्सिंग डे कसोटीसाठी भारताने लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोन्ही सलामीवीरांना बाकावर बसवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोघांच्या जागी संघात मयांक अग्रवाल आणि रवींद्र जडेजा यांना संधी देण्यात आली आहे. कोहली म्हणाला,'' दोन्ही संघ आक्रमक आहेत आणि दोघांचेही विजय मिळवण्याचे लक्ष्य आहे. त्यामुळे मैदानावर शेरेबाजीसारखे प्रकारही घडू शकतात. पण, आम्ही त्याकडे दुर्लक्ष करून सातत्याने चांगली कामगिरी करण्यावर भर देणार आहोत. मात्र, जोपर्यंत प्रतिस्पर्धी मर्यादा ओलांडत नाही, तोपर्यंत आम्ही संयम राखणार. पेन आणि माझ्यात जो वाद झाला तो भूतकाळ होता. मला कोणत्याच वादात अडकायचे नाही.''