मेलबर्न, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : यजमान ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या कसोटीत विजय मिळवून मालिकेत पुनरागमन केले. या विजयामुळे ऑस्ट्रेलियाने मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आणि त्यामुळे मेलबर्नवर होणाऱ्या तिसऱ्या कसोटीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या मालिकेत भारताला सलामीवीराच्या अपयशाची चिंता सतावत आहे. त्यामुळे 'बॉक्सिंग डे' कसोटीत भारतीय संघ कोणत्या सलामीच्या जोडीने उतरेल, याकडे लक्ष लागले आहे. त्यात ऑस्ट्रेलियानेही बुधवारपासून सुरु होणाऱ्या कसोटीसाठी नवी रणनीती आखली आहे. ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक जस्टीन लँगरने तिसऱ्या कसोटीत नव्या भिडूला संधी देण्याचे संकेत दिले आहेत. या नव्या भिडूच्या समावेशाने भारतीय संघाच्या गोटात चिंता नक्की पसरली असेल.
तिसऱ्या कसोटीसाठी यजमानांसमोर मिचेल मार्श आणि पीटर हॅण्ड्सकोम्ब यांच्यापैकी एका संधी देण्याचा पर्याय आहे. हॅण्ड्सकोम्बने चार डावांत अनुक्रमे 34, 14, 7 आणि 13 धावा करता आल्या आहेत. दुसरीकडे मार्शला शेफिल्ड शिल्ड स्पर्धेत सूर गवसलेला नाही, परंतु लँगर यांनी मार्शला खेळवण्याची पसंती दर्शवली आहे. मार्शला पहिल्या दोन कसोटी सामन्यांत बाकावर बसवण्यात आले होते. मात्र, मेलबर्नच्या खेळपट्टीचा अंदाज पाहता अष्टपैलू मार्शला संधी देण्यावर लँगर यांचा भर आहे.