Join us  

IND vs AUS 4rth T20I : भारतीय संघाची मालिकेत विजयी आघाडी; युवा खेळाडू ऑस्ट्रेलियावर पडले भारी 

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघाने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2023 10:30 PM

Open in App

IND vs AUS 4rth T20I Live : भारतीय संघाने चौथ्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय संघाने १७४ धावांचा यशस्वी बचाव केला. दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर संधी न मिळालेल्या अक्षर पटेलने आज ३ विकेट्स घेत विजयात महत्त्वाचा वाटा उचलला. रवी बिश्नोईने पुन्हा एकदा टिच्चून मारा करताना ऑस्ट्रेलियावर दडपण वाढवले अन् त्याचा फायदा पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरला ( २ विकेट्स) उचलता आला.

यशस्वी जैस्वाल ( ३७), ऋतुराज गायकवाड ( ३२) यांनी दमदार खेळ केला. पण, सूर्यकुमार यादव ( १) व श्रेयस अय्यर ( ८) अपयशी ठरले. रिंकू सिंगला आज मोठी खेळी करण्याची संधी मिळाली आणि त्याने खणखणीत फटकेही मारले. ऋतुराज व रिंकू सिंग यांनी ३१ चेंडूंत ४८ धावांची भागीदारी केली. जितेश शर्मानेही दोन खणखणीत षटकार खेचून इरादा स्पष्ट केला. रिंकू व जितेश यांनी पाचव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत ५६ धावांची भागीदारी केली. जितेश १९ चेंडूंत ३ षटकार व १ चौकारा लगावून ३५ धावांवर बाद झाला.  अक्षर पटेल भोपळ्यावर माघारी परतला. रिंकूचेही अर्धशतक हुकले. त्याने २९ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४६ धावा केल्या. भारताला २० षटकांत ९ बाद १७४ धावा करता आल्या. 

ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी चांगले कमबॅक करताना शेवटच्या ५ षटकांत ४५ धावा देत ५ विकेट्स घेतल्या. जेसन बेहरेनडॉर्फ व तनवीर संघा यांनी प्रत्येकी २, तर बेन डीवॉरशूईसने ३ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात जोश इंग्लिस व ट्रॅव्हिस हेड यांनी आक्रमक खेळ केला. दोघांनी ३.१ षटकांत फलकावर ४० धावा चढवल्या. रवी बिश्नोईने पुन्हा एकदा भागीदारी तोडण्याचे काम केले आणि इंग्लिस ( ८) त्रिफळाचीत  झाला. अक्षरने पुढच्या षटकात सेट फलंदाज ट्रॅव्हिसला बाद केले. त्याने १६ चेंडूंत ३१ धावा केल्या होत्या. बिश्नोईने धक्कासत्र सुरू ठेवताना बेन मॅकडेमोर्टला पायचीत केलेच होते, परंतु अम्पायर्स कॉलमुळे ऑस्ट्रेलियन फलंदाज नाबाद राहिला. 

पण, अक्षरने पुढच्याच षटकार आरोन हार्डीचा ( ८) त्रिफळा उडवून ऑसींना तिसरा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १० षटकांत ३ बाद ७६ धावा केल्या आणि त्यांना पुढील ६० चेंडूंत ९९ धावा करायच्या होत्या. अक्षरने त्याच्या स्पेलच्या शेवटच्या षटकात ऑसींना आणखी एक धक्का दिला. बेन ( १९) बाद झाल्याने ऑस्ट्रेलिया कोंडीत सापडले. पटेलने ४-०-१६-३ अशी स्पेल टाकली. संघात पुनरागमन करणाऱ्या दीपक चहरने भारताला मोठे यश मिळवून दिले आणि त्याने टीम डेव्हिडला ( १९) बाद केले. आता ऑसींनी ३० चेंडूंत ६७ धावा करायच्या होत्या आणि हाताशी ५ विकेट्स होत्या. त्यात चहरने मॅथ्यू शॉर्ट ( २२) ची विकेट मिळवली. चहरने त्याच्या ४ षटकांत ४४ धावा देत २ विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ७ बाद १५४ धावाच करता आल्या आणि भारताने २० धावांनी सामना जिंकला.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाअक्षर पटेलदीपक चहर