सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली बॉक्सिंग डे कसोटीत विजय मिळवून मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाच्या या पलटवारामुळे यजमान ऑस्ट्रेलियाची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यांना सिडनी कसोटीत मालिका वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे. 3 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या कसोटीसाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने नव्या भिडूला पाचारण केले आहे. ऑस्ट्रेलियाच्या डोक्यावर मालिका पराभवाचे ढग दाटू लागताच माजी खेळाडू संघाला मार्गदर्शन करण्यासाठी सरसारवले आहेत. सिडनी कसोटीत कोणता संघ घेऊन कर्णधार टीम पेनने मैदानावर उतरावे, याची आखणी माजी खेळांडूकडून होऊ लागली आहे. ऑसींचा माजी कर्णधार स्टीव्ह वॉ याच्या एका पोस्टवर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने चांगलाच टोमणा हाणला आहे.
भारतीय संघाने विजयासाठी ठेवलेल्या 399 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ 261 धावांवर गारद झाला. भारताने 137 धावांनी हा सामना जिंकून 41 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात दोन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा सामना 3 डिसेंबरपासून सिडनी येथे सुरू होणार आहे. या सामन्यात भारतीय संघ दोन फिरकीपटूंसह खेळण्याची शक्यता आहे. हा सामना जिंकून ऑस्ट्रेलियात प्रथमच मालिका विजयाची चव चाखण्यासाठी कोहली व सहकारी उत्सुक आहेत.
बॉक्सिंग डे कसोटीनंतर यजमान ऑस्ट्रेलियानं रडगाणं सुरू केले आहे. मेलबर्नची खेळपट्टी ही भारतीय गोलंदाजांसाठी उपयुक्त असल्याचा साक्षात्कार ऑसी कर्णधार टीम पेनला झाला आणि त्याने तसं मत व्यक्त करून पराभवाचं खापर खेळपट्टीवर फोडलं. पण, भारताच्या या विजयानंतर ऑस्ट्रेलियन संघ चांगलाच घाबरला आहे आणि मालिका वाचवण्याचे आव्हान त्यांच्यासमोर उभे राहिले आहे. ऑस्ट्रेलियाने चौथ्या सामन्यासाठी संघ जाहीर केला. त्यांनी संघात नवा भिडू घेतला आहे. मार्नस लॅबसचॅग्ने असे त्या भिडूचे नाव आहे. सिडनीची खेळपट्टी ही फिरकीपटूंना साथ देणारी असल्याने लॅबसचॅग्नेला संघात स्थान देण्यात आले आहे.