No Electricity At Stadium | रायपूर : सध्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ट्वेंटी-२० मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकून यजमान भारताने आघाडी घेतली. पण, तिसऱ्या सामन्यात ग्लेन मॅक्सवेलचे वादळ धडकले अन् मालिका २-१ अशी करण्यात कांगारूंना यश आले. तिसऱ्या लढतीतील विजयामुळे ऑस्ट्रेलियाचे मालिकेतील आव्हान कायम आहे. आज चौथा सामना रायपूर येथे खेळवला जाणार आहे. मात्र, सामन्याच्या पूर्वसंध्येलाच एक धक्कादायक बाब समोर आली. आजचा सामना रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह स्टेडियमवर खेळवला जाणार आहे.
दरम्यान, सामन्याला अवघे काही तास उरले असताना स्टेडियमच्या काही भागात वीज नसल्याचे उघडकीस आले. लक्षणीय बाब म्हणजे २००९ पासून वीजबिल थकवल्याने संबंधित स्टेडियमची वीज कापण्यात आली असल्याचे कळते. स्टेडियमचे ३.१६ कोटी रूपयांचे बिल थकित आहे, त्यामुळे स्टेडियमचे वीज कनेक्शन पाच वर्षांपूर्वी कापण्यात आले होते. मात्र, छत्तीसगड राज्य क्रिकेट असोसिएशनच्या विनंतीवरून तात्पुरते वीज कनेक्शन देण्यात आले आहे, परंतु तात्पुरत्या वीजेमुळे केवळ प्रेक्षक गॅलरी आणि बॉक्स येथील भागात प्रकाश जातो. खरं तर आजच्या सामन्यादरम्यान मोठ्या लाइट्स जनरेटर वापरून चालवाव्या लागणार आहेत.
३.१६ कोटींची थकबाकी सध्या असलेल्या तात्पुरत्या वीजेची क्षमता २०० किलोवॅट एवढी आहे, ती १ हजार किलोवॅटपर्यंत करण्यासाठी केलेला अर्ज मंजूर झाला आहे, परंतु त्यावर अद्याप काम सुरू झालेले नाही. २०१८ मध्ये हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या खेळाडूंना स्टेडियममध्ये वीजपुरवठा नसल्याचे लक्षात आल्यावर एकच गोंधळ झाला होता. त्यानंतरच सर्व प्रकार उघडकीस आला आणि २००९ पासून वीज बिल भरले नसल्याचे सांगण्यात आले, जे ३.१६ कोटी एवढे थकित आहे.
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ -सूर्यकुमार यादव (कर्णधार), ऋतुराज गायकवाड (उप कर्णधार), इशान किशन, यशस्वी जैस्वाल, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा, वॉशिंग्टन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान आणि मुकेश कुमार.
मालिकेतील उरलेले सामने -चौथा सामना - १ डिसेंबर, रायपूर पाचवा सामना - ३ डिसेंबर, हैदराबाद