रायपूर : भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध शहीद वीर नारायणसिंग आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर शुक्रवारी होणाऱ्या चौथ्या टी-२० सामन्यात विजय नोंदवून पाच सामन्यांची मालिका जिंकण्याची संधी असेल. मात्र, त्यासाठी युवा गोलंदाजांकडून भेदक मारा अपेक्षित आहे. स्फोटक ग्लेन मॅक्सवेलच्या अनुपस्थितीचा लाभ घेत हे गोलंदाज विशेषत: डेथ ओव्हरमध्ये कशी गोलंदाजी करतात, यावर विजयाचे समीकरण विसंबून असेल.
गुवाहाटीतील तिसऱ्या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अखेरच्या दोन षटकांत ४३ धावा मोजल्या. ऑस्ट्रेलियाने २२३ धावांचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर गाठले होते. प्रसिद्ध कृष्णाने ४ षटकांत ६८ आणि अखेरच्या षटकात २१ धावा दिल्या. चौथ्या सामन्याआधी दीपक चाहरचे संघात पुनरागमन झाले. तो उपयुक्त ठरू शकतो. दुसरीकडे लग्नामुळे एका सामन्याच्या ब्रेकनंतर डेथ ओव्हरतज्ज्ञ मुकेश कुमार संघात परतला. प्रसिद्ध आणि आवेश यांच्या चेंडूत विविधता नाही. दोघांनी १३०-१४० च्या वेगाने चेंडू टाकले; पण टप्प्यात अचूकता नसल्याचा लाभ फलंदाजांनी घेतला. याशिवाय यॉर्कर टाकण्यात दोघेही प्रभावी ठरले नव्हते.
श्रेयस संघात परतल्यामुळे तिलक वर्माला बाहेर बसावे लागेल. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, कर्णधार सूर्यकुमार यादव आणि फिनिशर रिंकू सिंग यांची निवड निश्चित असेल. ४८ चेंडूंत १०४ धावांचा पाऊस पाडणारा ग्लेन मॅक्सवेल मायदेशी परतल्याचा लाभ भारतीय खेळाडू घेऊ शकतील. पाहुण्या संघाकडे टिम डेव्हिड, जोश फिलीप आणि बेन मॅकडरमोट हे गोलंदाज आहेत. याशिवाय वनडे विश्वचषकाच्या फायनलमध्ये संस्मरणीय खेळी करणारा ट्रॅव्हिस हेड आणि कर्णधार मॅथ्यू वेड संघात आहे. येथे सायंकाळी दवबिंदूं पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नाणेफेक जिंकणारा संघ क्षेत्ररक्षणास प्राधान्य देईल, असे दिसते.
या फलंदाजांकडून अपेक्षाभारताचे युवा फलंदाज यशस्वी, ईशान किशन, रिंकू सिंग आणि कर्णधार सूर्यकुमार यादवसह श्रेयस अय्यर हे गरजेनुसार चांगली खेळी करू शकतात. ऋतुराजने तिसऱ्या सामन्यात ५७ चेंडूंत १२३ धावा केल्या होत्या.