ठळक मुद्देभारताने 2-1 अशा फरकाने ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिका जिंकलीचेतेश्वर पुजाराला मालिकावीराच्या किताबाने गौरविण्यात आले.
सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने सोमवारी इतिहास घडवला. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका 2-1 अशी खिशात घातली. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका विजयाची चव चाखण्यासाठी भारताला 72 वर्षांची प्रतीक्षा पाहावी लागली. 1947 मध्ये भारत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळली होती, पण एकदाही भारताला कसोटी मालिका विजय मिळवता आला नव्हता. याशिवाय कोहलीने आशियातील 29 कर्णधारांना न जमलेला पराक्रमही केला.
भारतीय संघाने ॲडलेड व मेलबर्न कसोटी जिंकून मालिकेत आघाडी घेतली होती. सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.
भारताला आतापर्यंत 11 मालिका जिंकण्यात अपयश आले. त्यापैकी 3 मालिका भारताने बरोबरीत सोडवल्या, तर 8 मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. 72 वर्षानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली. 1947 मध्ये ऑस्ट्रेलियात येणारा भारत हा पहिला आशियाई देश होता.
आशियाई देशांनी कांगारूंच्या देशात एकूण 98 सामने खेळले आणि त्यापैकी केवळ 11 मध्ये विजय मिळवले. आशियाई देशांनी आतापर्यंत येथे 31 दौरे केले आणि त्यात 29 कर्णधारांनी आपापल्या संघाचे नेतृत्व केले. या 29 कर्णधारांनी मिळूण एकूण 8 सामने जिंकले, परंतु त्यापैकी एकालाही कसोटी मालिका जिंकता आली नाही. कोहलीने हा पराक्रम करून दाखवला. ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा कोहली पहिलाच आशियाई कर्णधार ठरला आहे.