सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत नमवणारा पहिला आशियाई कर्णधार होण्याचा मान भारताच्या विराट कोहलीने पटकावला. 72 वर्षांत प्रथमच भारताला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने चार सामन्यांची मालिका 2-1 अशी जिंकली. या ऐतिहासिक कामगिरीत कोहलीच्या साथीला पत्नी अनुष्का शर्मा नसती, तर नवलच. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्याची घोषणेबरोबरच भारताच्या 2-1 अशा मालिका विजयावर शिक्कामोर्तब झाले. मग काय... भारतीय खेळाडूंपाठोपाठ अनुष्कानेही मैदानावर धाव घेतली आणि विराटला मिठीच मारली.
सिडनी कसोटीत भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.
त्यानंतर विराट आणि अनुष्का यांनी सर्वांचे लक्ष वेधले... फक्त अनुष्काच नव्हे तर भारतीय संघातील अन्य सदस्यांचे कुटुंबीयही पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते.