India vs Australi, 4th Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत यजमानांनी २-१ अशी आघाडी घेतली आहे. पण, ऑस्ट्रेलियाने इंदूर येथे झालेल्या तिसऱ्या कसोटीत त्यांचा खरा खेळ दाखवून भरताला पराभवाचा धक्का दिला. ऑस्ट्रेलियाची जीरवण्यासाठी इंदूर कसोटीत फिरकीपटूंना पोषक खेळपट्टी बनवण्यात आली, परंतु भारतीय संघ स्वतःच्याच जाळ्यात अडकला. त्यानंतर आयसीसीनेही या खेळपट्टीला 'Poor' असा दर्जा दिला. पॅट कमिन्स कौटुंबिक कारणास्तव मायदेशात परतल्यानंतर भारताला वाटले की आता कांगारूंना हरवणे अधिक सोपे झाले, पण अनुभवी स्टीव्ह स्मिथनं मालिकेत प्राण फुंकले. कल्पक नेतृत्वाच्या जोरावर त्याने भारतावर ९ विकेट्स राखून विजय मिळवला. आता चौथ्या कसोटीपूर्वी टीम इंडियाचं टेंशन वाढवणारी बातमी समोर येतेय...
तिसऱ्या कसोटीत भारतीय संघाला दोन डावांत अनुक्रमे १०९ व १६३ धावा करता आल्या होत्या. मॅथ्यू कुहनेमन व नॅथन लाएन यांच्या फिरकीसमोर भारतीय फलंदाजांनी शरणागती पत्करली. चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या डावात ५९ धावांची खेळी करून लाज वाचवली अन् भारताला ७६ धावांचे लक्ष्य तरी ठेवता आले. ट्रॅव्हीस हेड व मार्नस लाबुशेन यांनी हे लक्ष्य सहज पार करून ऑस्ट्रेलियाचे खाते उघडले. आता चौथ्या कसोटीत दोन्ही देशांचे पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याने ऑसींसाठी हा विजय आत्मविश्वास वाढवणारा ठरला आहे. त्यात आता स्टीव्ह स्मिथच चौथ्या कसोटीत नेतृत्व करताना दिसणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स दुसऱ्या कसोटीनंतर मायदेशात परतला. त्याच्या आईची प्रकृती ठिक नाही. त्यामुळे त्याने कुटूंबियांसोबतच राहण्याचा निर्णय घेतला. आता तो चौथ्या कसोटीतही परतणार नसल्याचे वृत्त समोर येत आहे. अशात स्मिथकडेच नेतृत्व कायम राहणार आहे. ९ मार्चपासून अहमदाबाद कसोटीला सुरुवात होत आहे. कमिन्सच्या खेळण्याबाबत विचारले असता मुख्य प्रशिक्षक अँड्य्रू मॅकडोनाल्ड म्हणाले,'' तो अजूनही घरीच आहे, परंतु आम्ही त्याच्या संपर्कात आहोत. या कठीण प्रसंगी आम्ही सर्व त्याच्या आणि त्याच्या कुटुंबियांसोबत आहोत.''
भारताने २-० अशी आघाडी घेऊन बॉर्डर गावस्कर ट्रॉफी स्वतःकडे ठेवली होती, परंतु ऑस्ट्रेलियाने २-२ अशी बरोबरी मिळवल्यास ती त्यांच्याकडे जाईल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"