भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला. अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेतील खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला आहे. तीनही सामन्यांचे निकाल तीन दिवसांत लागले. आयसीसीने इंदूरची खेळपट्टी खराब असल्याचे सांगून तिला तीन डिमेरिट गुणही दिले होते. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत कोणत्या प्रकारची खेळपट्टी आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी सामान्य राहू शकते. म्हणजेच ही खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी अनुकूल असेल. मात्र याचदरम्यान न्यूझीलंड क्रिकेट संघाचा माजी कर्णधार डॅनियल व्हेटोरी याने ऑस्ट्रेलिया संघाला विजयाचा मंत्र दिला आहे. ९ मार्चपासून येथे सुरू होणाऱ्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या आणि शेवटच्या कसोटीपूर्वी डॅनियल व्हेटोरीने ऑस्ट्रेलिया संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांना अधिक धाडसी होण्यासाठी आणि काही उपयुक्त धावा करण्याचे आवाहन केले आहे.
रोहितने उडवला कोहलीवर रंग; चौथ्या कसोटी सामन्याआधी खेळाडूंनी केली धुळवड, पाहा Video
डॅनियल व्हेटोरी म्हणाला की, चौथ्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलिया संघ व्यवस्थापन आणि सपोर्ट स्टाफने खालच्या फळीतील फलंदाजांमध्ये अधिक आत्मविश्वास निर्माण केला पाहिजे. मला विश्वास आहे की पॅट कमिन्सने दिल्लीतील पहिल्या डावात चमकदार फलंदाजी केली आणि मला वाटते की चार खालच्या फळीतील फलंदाजांना हे कसे करायचे आणि ते कसे करू शकतात. मात्र त्यासाठी थोडं धाडस लागेल, असं व्हेटोरीने सांगितले.
भारतीय संघाचा गोलंदाज उमेश यादवची तिसऱ्या कसोटीमधील खेळी पाहा. त्याने आक्रमक खेळी खेळली. खालच्या फळीतील फलंदाजांकडे अशी आक्रमकता दाखवण्याचा परवाना आहे. अशा प्रकारच्या फलंदाजीने फरक पडू शकतो. ऑस्ट्रेलियाच्या खालच्या फळीतील चार फलंदाजांमध्ये असा आत्मविश्वास निर्माण करण्याची गरज आहे, असं डॅनियल व्हेटोरीने एका मुलाखतीत बोलताना सांगितले.
भारतासाठी विजय खूप महत्त्वाचा-
अहमदाबाद कसोटी जिंकणे भारतीय संघासाठी खूप महत्त्वाचे असेल. जर ती हमदाबादमध्ये जिंकली तर ती WTC फायनलमध्ये पोहोचेल. ऑस्ट्रेलियन संघाचा सामना अनिर्णित राहिला किंवा विजय मिळवला तर भारतासाठी कठीण होईल. अशा स्थितीत न्यूझीलंडचा संघ श्रीलंकेविरुद्धचा किमान एक सामना ड्रॉ करेल किंवा जिंकेल अशी प्रार्थना भारताला करावी लागेल.
पराभवामुळे टीम इंडियाचा प्लॅन बदलला-
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला चकित केले होते. पण इंदूर कसोटी सामन्यात नॅथन लायन आणि मॅट कुहनमन यांनी रचलेल्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी फिरकीचे असे जाळे विणले की भारताला दोन्ही डावात ३०० धावाही करता आल्या नाहीत.