भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत आतापर्यंत तीन सामने खेळले गेले. या तिन्ही सामन्यांचा निकाल तीन दिवसांत लागला. अशा स्थितीत तिन्ही सामन्यांच्या खेळपट्टीवर चांगलाच गोंधळ उडाला आहे. चार सामन्यांच्या मालिकेत भारत २-१ ने पुढे आहे. अहमदाबादमध्ये ९ मार्चपासून अखेरची कसोटी खेळली जाणार आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी भारतीय संघासाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेतील खेळपट्टीवरून बराच गदारोळ झाला आहे. तीनही सामन्यांचे निकाल तीन दिवसांत लागले. आयसीसीने इंदूरची खेळपट्टी खराब असल्याचे सांगून तिला तीन डिमेरिट गुणही दिले होते. अशा स्थितीत अहमदाबाद कसोटीत कोणत्या प्रकारची खेळपट्टी आहे हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अहमदाबाद कसोटी सामन्यासाठी खेळपट्टी सामान्य राहू शकते. म्हणजेच ही खेळपट्टी गोलंदाजी आणि फलंदाजीसाठी अनुकूल असेल. ऑस्ट्रेलियाने इंदूर कसोटी जिंकून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये धडक मारली आहे. आता अंतिम फेरीतील दुसऱ्या जागेसाठी टीम इंडिया आणि श्रीलंकेत काँटे की टक्कर आहे. मात्र टीम इंडियाची फायनलमध्ये पोहण्याची शक्यता अधिक आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया विरुद्धचा चौथा कसोटी सामना गमावला तरीही फायनलमध्ये पोहचू शकते. मात्र त्यासाठी दुसऱ्या बाजूला न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामना हा अनिर्णित रहायला हवा.
न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील २ सामन्यांच्या कसोटी मालिकेची सुरुवात ८ मार्चपासून होत आहे. श्रीलंकेला फायनलमध्ये पोहचायचं असेल, तर त्यांना न्यूझीलंडचा दोन्ही सामन्यात पराभव करावा लागेल, जे शक्य नाही. न्यूझीलंड विरुद्ध श्रीलंका यांच्यातील एकही सामना अनिर्णित राहिला, तर श्रीलंका फायनलच्या स्पर्धेतून बाहेर फेकली जाईल. तर टीम इंडियाची एन्ट्री होईल. अशाप्रकारे ७ जून रोजी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात गदासाठी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया भिडतील.
पराभवामुळे टीम इंडियाचा प्लॅन बदलला-
भारतीय संघाने पहिल्या दोन सामन्यात चमकदार कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाला चकित केले होते. पण इंदूर कसोटी सामन्यात नॅथन लायन आणि मॅट कुहनमन यांनी रचलेल्या जाळ्यात भारतीय संघ अडकला. ऑस्ट्रेलियन फिरकीपटूंनी फिरकीचे असे जाळे विणले की भारताला दोन्ही डावात ३०० धावाही करता आल्या नाहीत.