सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : भारतीय संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत हार मानण्यास भाग पाडले. पाचवा दिवसही पावसामुळे वाया गेल्यामुळे चौथी कसोटी अनिर्णीत राहिली आणि भारताने 2-1 अशा फरकाने मालिका जिंकली. ऑस्ट्रेलियात 72 वर्ष 11 कसोटी मालिका खेळल्यानंतर भारताला प्रथमच मालिका विजयाची पताका रोवता आली.
करा किंवा मरा या कात्रीत सापडलेल्या ऑसींकडून दर्जेदार खेळ झाला नाही. त्यांचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही.
भारतीय संघ 1947 मध्ये पहिल्यांदा ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका खेळला होता. त्यानंतर आतापर्यंत 11 मालिकेत भारताला विजय मिळवता आले नाही. त्यापैकी 3 मालिका भारताने बरोबरीत सोडवल्या, तर 8 मालिकांत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने इतिहास घडविला. 72 वर्षानंतर भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकता आली.