India vs Australia, 4th Test : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तिन्ही कसोटी सामन्यांचा निकाल तीन दिवसात लागला. ऑस्ट्रेलियन फलंदाजच नव्हे, तर भारतीय फलंदाजही फिरकी गोलंदाजीसमोर अडखळताना दिसले. इंदूर कसोटीत भारताला दोनशेच्या आसपासही पोहोचता आले नाही. टीम इंडियाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर ( Gautam Ghambir) च्या मते, भारतीय फलंदाज षटकार मारायला शिकले, परंतु बचाव करणे विसरले आहेत. एकेकाळी फिरकी खेळण्यात माहिर मानला जाणारा भारतीय संघ आता ही कला विसरला आहे. गेल्या काही वर्षांत ही समस्या पुन्हा पुन्हा पाहायला मिळत आहे.
'स्पोर्ट्स तक'ला दिलेल्या मुलाखतीत गंभीर म्हणाला, ''फिरकी गोलंदाजीवर खेळण्याची कला भारतीय फलंदाज विसरले आहेत. बचावात आत्मविश्वास असल्याशिवाय तुम्ही आक्रमण करू शकत नाही. नॅथन लियॉनसारखा गोलंदाज प्रत्येक चेंडूला मारू देईल, असे वाटत असेल तर तसे होणार नाही. टर्निंग ट्रॅक असो किंवा सपाट खेळपट्टी असो, संरक्षण महत्त्वाचे असते. आम्ही खेळायचो तेव्हा प्रशिक्षक आम्हाला पॅडने नव्हे तर बॅटने बचाव करायला सांगायचे. बॅट पॅडच्या समोर असावी. तसे न झाल्यास आम्ही संघर्ष करू. DRS आल्यापासून ते अधिक महत्त्वाचे झाले आहे. खेळाडूंची षटकार मारण्याची क्षमता वाढली आहे पण तुमचा पाया डळमळीत झाला आहे.''
रणजी करंडक स्पर्धेत खेळाडूंनी खेळावे, असा सल्लाही गंभीरने दिला. ''ऑस्ट्रेलिया मालिकेपूर्वी अनेक भारतीय फलंदाजांना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली होती, परंतु कोणीही त्यात खेळला नाही. प्रत्येक मोठ्या मालिकेपूर्वी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे,''असे गंभीर म्हणाला.
तो म्हणाला, 'रणजी ट्रॉफी खेळायला हवी होती. यापेक्षा चांगली तयारी होऊ शकली नसती. १५-२० दिवस शिबिरे लावा... ऑस्ट्रेलियाला पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये संघर्ष करावा लागला कारण ते सराव सामने खेळले नाहीत. ही नकारात्मक मानसिकता आहे. गोलंदाज विश्रांती घेऊ शकतात पण फलंदाजांनी रणजी ट्रॉफी खेळली पाहिजे. तिथे जा आणि १००,२०० धावा करा. जरी धावा झाल्या नाहीत तर तुम्ही लाल चेंडूने खेळण्यासाठी झोनमध्ये जाल. मोठ्या मालिकेपूर्वी लाल चेंडूने खेळण्याची संधी मिळेल तेव्हा खेळायला हवे.''
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"