सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : मयंक अग्रवाल भारताकडून आता फक्त दुसरा कसोटी सामना खेळला. या दोन सामन्यांमध्येच मयंकने माजी कर्णधार, महान सलामीवीर आणि समालोचक सुनील गावस्कर यांच्याशी कशी बरोबरी केली, हा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. पण या दोन सामन्यांमध्येच मयंकने गावस्कर यांच्याशी बरोबरी केल्याचे समोर आले आहे.
मयांकने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताकडून पदार्पण केले होते. या सामन्यात त्याने 72 धावांची खेळी साकारली होती. त्यानंतर सिडनी येथे सुरु असलेल्या सामन्याच्या पहिल्या दिवशी मयंकने 77 धावांची खेळी साकारली. दोन्ही कसोटी सामन्यांत मयंकला एकही शतक झळकावता आलेले नाही, तर मग त्याने गावस्कर यांच्याशी कशी बरोबरी केली, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल.
मयंकने आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली. गावस्कर यांनीही आपल्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये दोन अर्धशतके झळकावली होती. त्याचबरोबर भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉ यानेही पहिल्या तीन डावांत दोन अर्धशतके झळकावली होती. त्यामुळे पहिल्या तीन डावांत दोन अर्धशतके झळकावण्याचा मान मयंकने पटकावला आहे आणि तो ही कामगिरी करणारा तिसरा भारतीय फलंदाज ठरला आहे.