Join us  

India vs Australia, 4th Test : पावसामुळे दुसऱ्या दिवसाची ३५ षटकं वाया; टीम इंडिया ३०७ धावांनी पिछाडीवर

 India vs Australia, 4th Test : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, परंतु सलामीवीरांनी पुन्हा निराश केलं.

By स्वदेश घाणेकर | Published: January 16, 2021 12:44 PM

Open in App

 India vs Australia, 4th Test : भारतीय गोलंदाजांनी दुसऱ्या दिवसाचे पहिले सत्र गाजवले, परंतु सलामीवीरांनी पुन्हा निराश केलं. ऑस्ट्रेलियानं दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठवून टीम इंडियाला बॅकफूटवर पाठवले. रोहित शर्मानं ( Rohit Sharma) मारलेला बेजबाबदार फटका दुसऱ्या दिवसातील चर्चेचा विषय ठरला. पण, पावसानं संपूर्ण तिसरे सत्र वाया घालवले. त्यामुळे जवळपास ३५ षटकं आधी खेळ थांबवावा लागला. टीम इंडिया अजूनही ३०७ धावांनी पिछाडीवर आहे. 

फलंदाजांसाठी नंदनवन असलेल्या खेळपट्टीवर भारताच्या अनुनभवी गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) व वॉशिंग्टन सूंदर ( Washington Sunder) यांनी कांगारूंचा डाव ३६९ धावांवर गुंडाळला. ऑस्ट्रेलियाचा संघ एकावेळी ३ बाद २०० धावा अशा मजबूत स्थितीत होता, परंतु टीम इंडियाच्या अनुनभवी गोलंदाजांनी चांगले कमबॅक केले आणि त्यांचा संपूर्ण डाव ३६९ धावांत गुंडाळला.  पेन १०४ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५० धावांवर माघारी परतला. शार्दूलच्या धक्क्यानंतर वॉशिंग्टन सुंदरनं दुसरा सेट फलंदाज कॅमेरून ग्रीनचा ( ४७) त्रिफळा उडवला. शार्दूल ठाकूर, टी नटराजन व वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. मोहम्मद सिराजला एका विकेटवर समाधान मानावे लागले. 

गोलंदाजांच्या कौतुकास्पद कामगिरीनंतर टीम इंडियाच्या फलंदाजांची जबाबदारी होती. शुबमन गिल व रोहित यांनी सावध सुरुवात केली. पण, पॅट कमिन्सच्या चेंडूचा वेगाचा अंदाज बांधण्यास गिल चुकला अन् स्टीव्ह स्मिथनं स्लीपमध्ये सुरेख झेल टिपला. रोहित व चेतेश्वर पुजारा ही जोडी चांगलीच जमली होती. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ४९ धावा जोडल्या, परंतु अर्धशतकाच्या उंबरठ्यावर असलेल्या रोहितला मोठा फटका मारण्याचा मोह आवरता आला नाही. लियॉनचा चेंडू सीमापार मारण्याच्या प्रयत्नात मिचेल स्टार्कच्या हाती झेल देऊन रोहित माघारी परतला. त्यानं ७४ चेंडूंत ६ चौकारांसह ४४ धावा केल्या. टीम इंडियाच्या २ बाद ६२ धावा झाल्या आहेत. चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे खेळपट्टीवर आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारोहित शर्माशुभमन गिल