ब्रिस्बेन : तळाचे फलंदाज वॉशिंग्टन सुंदर व शार्दूल ठाकूर यांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये शतकी भागीदारी करीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध चौथ्या व निर्णायक कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवशी रविवारी येथे भारताचे आव्हान कायम राखले.ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील ३६९ धावसंख्येच्या प्रत्युत्तरात आघाडीची फळी अपयशी ठरल्यामुळे बॅकफूटवर असलेला भारतीय संघ शेवटी पहिल्या डावात ३३६ धावांची सन्मानजनक मजल मारण्यात यशस्वी ठरला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसअखेर आपल्या दुसऱ्या डावात बिनबाद २१ धावा केल्या होत्या. त्यांच्याकडे एकूण ५४ धावांची आघाडी आहे. आजचा खेळ थांबला त्यावेळी डेव्हिड वॉर्नर (२०) व मार्कस् हॅरिस (१) खेळपट्टीवर होते.भारताने पहिल्या सत्रात ९९ व दुसऱ्या सत्रात ९२ धावा वसूल केल्या. दरम्यान, प्रत्येक सत्रात दोन विकेट गमावल्या. तिसऱ्या सत्रात तळाच्या फलंदाजांनी अखेरपर्यंत संघर्ष केला. भारताने या सत्रात ४ गड्यांच्या मोबदल्यात ८३ धावा वसूल केल्या. ऑस्ट्रेलियातर्फे जोश हेजलवुडने ५७ धावांच्या मोबदल्यात ५ बळी घेतले. मिशेल स्टार्क व पॅट कमिन्स यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. भारताने सकाळच्या सत्रात चेतेश्वर पुजारा (२५) व कर्णधार अजिंक्य रहाणे (३७), तर दुसऱ्या सत्रात मयांक अग्रवाल (३८) व ऋषभ पंत (२३)यांना गमावले. या चारही फलंदाजांनी सकारात्मक सुरुवात केली, पण त्यांना मोठी खेळी करता आली नाही. दहाव्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या मोहम्मद सिराजने १३ धावांचे योगदान दिले. त्याआधी, सकाळच्या सत्रात २ बाद ६२ धावसंख्येवरून पुढे खेळताना पहिल्या तासात भारतीय फलंदाजांनी ऑस्ट्रेलियाला यश मिळू दिले नाही.
सुंदर व ठाकूरची शतकी भागीदारी -- सुंदर व ठाकूर यांनी ऑस्ट्रेलियाच्या मोठी आघाडी मिळविण्याच्या आशेवर पाणी फेरले. सुंदरने आखूड टप्प्याच्या माऱ्याला समर्थपणे तोंड दिले व आपल्या बचावाने प्रभावित केले. ठाकूरनेही ऑस्ट्रेलियाच्या वेगवान माऱ्यापुढे दडपण झुगारत फलंदाजी केली. - ऑस्ट्रेलियाने ८० षटके पूर्ण झाल्यानंतर नवा चेंडू घेतला, पण त्याचा या दोघांवर परिणाम झाला नाही. त्यांनी नव्या चेंडूने ऑस्ट्रेलियाला २२ षटके यश मिळू दिले नाही. ठाकूरने १०० वा कसोटी सामना खेळणाऱ्या लियोनच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत अर्धशतक पूर्ण केले.
- याच षटकात सुंदरने चौकार ठोकत सातव्या विकेटसाठी शतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्या षटकात सुंदरनेही वैयक्तिक अर्धशतक पूर्ण केले. कमिन्सचा एक गुडलेंग्थ चेंडू ठाकूरचा बचाव भेदत यष्टीवर आदळला. त्यामुळे ही भागीदारी संपुष्टात आली. ठाकूरने ११५ चेंडूंना सामोरे जाताना ९ चौकार व २ षटकार लगावले. सुंदरने ११४ चेंडू खेळताना ७ चौकार व १ षटकार लगावला.उभय संघांतर्फे दुसरी सर्वोच्च भागीदारी - भारताची एकवेळ ६ बाद १८६ अशी अवस्था होती. त्यावेळी भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावातील धावसंख्येच्या तुलनेत १८३ धावांनी पिछाडीवर होता. - ठाकूर (६७) व सुंदर (६२) यांनी सातव्या विकेटसाठी १२३ धावांची भागीदारी करीत डाव सावरला. सध्या सुरू असलेल्या मालिकेत उभय संघांतर्फे ही दुसरी सर्वोच्च भागीदारी आहे.धावफलक -ऑस्ट्रेलिया पहिला डाव - ३६९भारत पहिला डाव : रोहित शर्मा झे. स्टार्क गो. लियोन ४४, शुभमन गिल झे. स्मिथ गो. कमिन्स ०७, चेतेश्वर पुजारा झे. पेन गो. हेजलवुड २५, अजिंक्य रहाणे झे. वेड गो. स्टार्क ३७, मयांक अग्रवाल झे. स्मिथ गो. हेजलवुड ३८, ऋषभ पंत झे. ग्रीन गो. हेजलवुड २३, वॉशिंग्टन सुंदर झे. ग्रीन गो. स्टार्क ६२, शार्दूल ठाकूर त्रि. गो. कमिन्स ६७, नवदीप सैनी झे. स्मिथ गो. हेजलवुड ०५, मोहम्मद सिराज त्रि. गो. हेजलवुड १३, टी. नटराजन नाबाद ०१. अवांतर (१४). एकूण १११.४ षटकांत सर्वबाद ३३६. बाद क्रम : १-११, २-६०, ३-१०५, ४-१४४, ५-१६१, ६-१८६, ७-३०९, ८-३२०, ९-३२८, १०-३३६. गोलंदाजी : स्टार्क २३-३-८८-२, हेजलवुड २४.४-६-५७-५, कमिन्स २७-५-९४-२, ग्रीन ८-१-२०-०, लियोन २८-९-६५-१, लाबुशेन १-०-१०-०.ऑस्ट्रेलिया दुसरा डाव : मार्कस् हॅरिस खेळत आहे ०१, डेव्हिड वॉर्नर खेळत आहे २०. एकूण ६ षटकांत बिनबाद २१. गोलंदाजी : सिराज २-१-१२-०, नटराजन ३-०-६-०, सुंदर १-०-३-०.