India vs Australia, 4th Test Day 3 : आघाडीचे सहा फलंदाज माघारी परतल्यानंतर टीम इंडियाचे शेपूट झटपट गुंडाळून मोठी आघाडी घेण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या ऑस्ट्रेलियाला चांगली चपराक बसली. पदार्पणवीर वॉशिंग्टन सुंदर ( Washington Sunder) आणि शार्दूल ठाकूर ( Shardul Thakur) यांनी ऑसी गोलंदाजांना धु धु धुतले. भारताकडून पहिल्या डावात सर्वाधिक वैयक्तिक खेळीचा विक्रमाही दोघांनी नावावर केला. या दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करताना टीम इंडियाचा डाव सावरला आणि कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा २० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. तसेच सुंदरनं ११० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात पराक्रमी कामगिरी करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला.
ऑस्ट्रेलियानं पहिल्या सत्रात अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजाराला माघारी पाठवून टीम इंडियाला मोठा धक्का दिला. मयांक अग्रवाल ( Mayank Agarawal) पुन्हा एकदा मिळालेल्या संधीचं सोनं करण्यात अपयशी ठरला. त्यात रिषभ पंतही ( Rishabh Pant) विचित्र फटका मारून माघारी परतल्यानं टीम इंडिया संकटात सापडली. सुंदर आणि ठाकूर यांनी टीम इंडियाचा डाव सावरला. फलकावर १८६ धावा असताना रिषभ माघारी परतला. भारत १८३ धावांनी पिछाडीवर होता आणि ऑस्ट्रेलिया शेपूट झटपट गुंडाळेल असेच वाटत होते.
सुंदर आणि ठाकूर यांनी ऑसींना धक्का दिला. दोघांनी सातव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. या डावातील ही पहिलीच अर्धशतकी भागीदारी ठरली. या दोघांनी ब्रिस्बेनवर भारतासाठी सातव्या विकेटसाठीची सर्वोत्तम भागीदारीचा विक्रमही नावावर केला. या दोघांनी ५९ धावा करताच १९९१चा कपिल देव व मनोज प्रभाकर यांचा विक्रम मोडला. कपिल देव - मनोद प्रभाकर यांनी ५८ धावांची भागीदारी केली होती.