Join us  

IND vs AUS 4th Test : ...हा तर 83 च्या 'वर्ल्ड कप'पेक्षाही मोठा विजय!

IND vs AUS 4th Test: पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला आणि भारताने चार सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 07, 2019 11:33 AM

Open in App
ठळक मुद्देभारताने 72 वर्षांत प्रथमच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकलीऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकणारा विराट कोहली हा पहिलाच आशियाई कर्णधार

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : सिडनी कसोटीचा पाचवा दिवसही पावसाने वाया गेल्याने भारताला आणखी एक कसोटी विजयापासून वंचित रहावे लागले. मात्र, अॅडलेड आणि मेलबर्न कसोटीतील निकालांनी भारताचा मालिका विजय निश्चित केला होता. पाचव्या दिवसाचा खेळ पावसामुळे एकही चेंडू न खेळता रद्द करण्यात आला आणि भारताने चार सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. भारताने ऑस्ट्रेलियात 72 वर्षांत प्रथमच मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षावही होत आहे. कर्णधार विराट कोहली आणि मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या आनंदासमोर गगनही ठेंगणं दिसत आहे. 

सिडनी कसोटीत  भारताने पहिल्या डावातच 622 धावांचा डोंगर उभा केला. चेतेश्वर पुजारा ( 193 ) आणि रिषभ पंत ( 159* ) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर भारताने पहिला डाव 7 बाद 622 धावांवर घोषित केला. ऑसींचा पहिला डाव 300 धावांवर गडगडला. कुलदीप यादवने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन देत आपला मालिका विजय पक्का केला. चौथ्या दिवशी बिनबाद 6 धावांवर असताना खेळ थांबला. सोमवारी पाऊस कायम राहिल्याने खेळ झाला नाही. 

सामना अनिर्णीत राहिल्यामुळे भारताच्या 2-1 अशा विजयावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शास्त्री म्हणाले की,''हा निकाल माझ्यासाठी खूप समाधानकारक आहे. माझ्यासाठी 1983 चा वर्ल्ड कप आणि 1985 ची वर्ल्ड चॅम्पियनशीप यापेक्षाही हा मालिका विजय मोठा आहे. हे कसोटी क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खरा कस या प्रकारात लागतो.'' 

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियारवी शास्त्रीविराट कोहलीबीसीसीआय