rohit sharma angry video । अहमदाबाद: अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि शेवटच्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या तासात टीम इंडियाला फलंदाजी करण्याची संधी मिळाली. भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. या दोघांवर भारताला मोठी सुरुवात करून देण्याची जबाबदारी आहे. दुसऱ्या दिवसाअखेर रोहित आणि गिलची जोडी 10 षटकांत 36 धावा करून खेळपट्टीवर टिकून आहे.
दरम्यान, भारताच्या डावाच्या नवव्या षटकात कर्णधार रोहित शर्माला काही अडचणींचा सामना करावा लागला. ज्याची तक्रार त्याने अम्पायरकडे केली. त्याचवेळी यादरम्यान भारतीय कर्णधार स्टँडवर बसलेल्या प्रेक्षकांवर चांगलाच संतापला, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
रोहित शर्माला राग अनावर ऑस्ट्रेलियाकडून कुहनमेन नववे षटक टाकत होता. त्याने आपला दुसरा चेंडू रोहित शर्माला टाकला, जो हिटमॅनने मिड-ऑफच्या दिशेने खेळला आणि 1 धाव घेतली. नॉन स्ट्राईकच्या दिशेने येताना रोहितने अम्पायरकडे तक्रार केली. सरळ दिशेत असलेल्या काही प्रेक्षकांमुळे भारतीय कर्णधाराला अडचणींचा सामना करावा लागत होता. प्रेक्षकांच्या हालचालींमुळे रोहितचे लक्ष फलंदाजीवरून विचलित होत होते. याबाबत त्याने अम्पायरकडे तक्रार केली, त्यावर तात्काळ कारवाई करून प्रेक्षकांना त्या ठिकाणाहून हटवण्यात आले.
अश्विनने केली कमाल भारताकडून अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनने अप्रतिम कामगिरी केली. अश्विनने शानदार गोलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला 480 धावांवर रोखण्यात मोठी भूमिका बजावली. अश्विनने 47.2 षटके टाकली आणि 91 धावांत 6 बळी घेतले. अश्विनने 5 किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची कसोटी क्रिकेटमधील ही 32वी वेळ आहे.
खरं तर कांगारूच्या संघाने आपल्या पहिल्या डावात 167.2 षटकांत 480 धावा करून भाराताला कडवे आव्हान दिले. दुसऱ्या दिवसाअखेर पाहुण्या संघाने तब्बल 444 धावांची आघाडी घेतली आहे. ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजाने सर्वाधिक 180 धावांची खेळी केली, तर कॅमेरून ग्रीनने 114 धावा करून भारतीय गोलंदाजांचा समाचार घेतला. याशिवाय ट्रेव्हिस हेड (32), स्टीव्ह स्मिथ (38) आणि टोड मुर्फीने (41) धावांची खेळी केली. भारताकडून रविचंद्रन अश्विनने सर्वाधिक 6 बळी घेतले, तर मोहम्मद शमी (2) आणि रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येकी 1-1 बळी घेण्यात यश आले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"