Gamechanger Player, IND vs AUS 1st Test: भारतीय संघ बॉर्डर-गावसकर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) खेळायला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आला आहे. २२ नोव्हेंबर ते ७ जानेवारी असा तब्बल प्रदीर्घ काळ हा दौरा सुरु असणार आहे. भारतीय संघाची नुकतीच न्यूझीलंड विरूद्धची मालिका संपली असून त्यात भारतावर ३-०ने पराभवाची नामुष्की ओढवली. आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियात पोहोचला आहे. भारतीय संघ कोणताही सराव सामना न खेळता २२ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पर्थ कसोटीत उतरणार आहे. ऑस्ट्रेलियाविरूद्धची मालिका भारताच्या WTC Final च्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या संपूर्ण मालिकेत दोन खेळाडू मालिका गाजवतील असा अंदाज ऑस्ट्रेलियाचा माजी सलामीवीर आरोन फिंचने व्यक्त केला.
"मला असं वाटतं की दोन्ही संघांचे विकेटकिपर मालिकेत निर्णायक भूमिका बजावतील. रिषभ पंत आणि अलेक्स कॅरी हे या मालिकेतील महत्त्वाचे खेळाडू ठरतील. या दोघांसाठी ही मालिका खूपच महत्त्वाची आहे. अलेक्स कॅरीसाठी सातव्या क्रमांकाची बॅटिंग आणि रिषभ पंतसाठी सहाव्या क्रमांकाची बॅटिंग याकडे साऱ्यांचेच लक्ष असणार आहे. अलेक्स कॅरी हा आक्रमक फलंदाज आहे आणि रिषभ पंतदेखील आक्रमक फलंदाज आहे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर असे खेळाडू असतात तेव्हा सामना कधीही कुठल्याही दिशेने वळू शकतो आणि तोच थरार क्रिकेटमधील रोमांच टिकवून ठेवतो," असे फिंच म्हणाला.
बॉर्डर गावसकर ट्रॉफीमधील या दोघांची आकडेवारी पाहायची झाल्यास, कॅरीने आतापर्यंत ४ कसोटी खेळल्या असून त्यात केवळ ५६ धावा केल्या आहेत. त्याची सरासरी ९.३३ आहे आणि सर्वोत्तम धावसंख्या ३६ आहे. याशिवाय, भारत-ऑस्ट्रेलिया WTC 2023 Final मध्ये दोन डावांत त्याने ४८ आणि नाबाद ६६ ठोकल्या असतात. रिषभ पंतने BGT मध्ये ७ सामने खेळले असून त्यातील १२ डावांत एकूण ६२४ धावा केल्या आहेत. ६२च्या सरासरीने त्याने १ शतक आणि २ अर्धशतके लगावली आहेत.