सिडनीभारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेला उद्या २७ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघाचा सलामीचा फलंदाज रोहित शर्मा एकदिवसीय मालिकेला मुकणार आहे. त्यामुळे भारतीय संघाच्या सलामीजोडीत शिखर धवनला कोणता खेळाडू साथ देणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.
भारतीय संघाच्या सलामीजोडीबाबत ऑस्ट्रेलियाच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार अरोन फिंच यानं एक नाव सुचवलं आहे. भारताच्या डावाची सुरुवात करण्यासाठी शिखर धवनचं नाव जवळपास निश्चित झालं आहे. तर दुसऱ्या नावासाठी मयांक अग्रवाल, शुभमन गिल आणि केएल राहुल यांच्यापैकी एका खेळाडूची निवड होण्याची शक्यता आहे. पण अरोन फिंच यानं मयांक अग्रवालच्या नावाला पसंती दिली आहे.
''भारतीय संघाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्माची जागा मयांक अग्रवाल भरुन काढू शकतो. मयांक हा उत्तम पर्याय आहे. तो एक चांगला खेळाडू आहे यात काहीच शंका नाही आणि आमच्या विरोधात त्यानं चांगली फलंदाजी देखील केली आहे. रोहित शर्माचं दुखापतग्रस्त होणं हे नक्कीच निराशाजनक आहे. कारण तुमचे सर्वोत्तम खेळाडू सामन्यात खेळावेत अशी तुमची इच्छा असते. त्यामुळे रोहितच्या जागेवर मयांकची निवड होऊ शकते आणि तो सध्या चांगल्या फॉर्मात देखील आहे", असं अरोन फिंच म्हणाला.
कोहलीला बाद करणं आमचं लक्ष्यभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला लवकर बाद करणं हे आमचं लक्ष्य असेल असंही फिंचने सांगितलं. कोहलीच्या कमकुवत दुव्यांवरही फिंचने भाष्य केलं. ''खरं सांगायचं झालं तर कोहलीच्या कमकुवत बाजू खूप कमी आहेत. त्याला लवकर कसं बाद करता येईल हाच आमचा प्रयत्न असेल. कारण विराट हा एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम खेळाडूंपैकी एक खेळाडू आहे'', असं फिंचने म्हटलं आहे.