टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पहिल्या कसोटी सामन्यानंतर अनुष्का शर्माच्या बाळंतपणासाठी मायदेशी परतणार आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत ही जबाबदारी कोणाकडे सोपवावी, अशी चर्चा सुरू झाली आहे. नियमानुसार उपकर्णधार अजिंक्य रहाणे ( Ajinkya Rahane) ही जबाबदारी पार पाडेल, परंतु रोहित शर्मानं ही धुरा सांभाळावी, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्या अनेकांना रहाणेनं आज सराव सामन्यातून उत्तर दिले. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया A अशा सराव सामन्याला आजपासून सुरुवात झाली. त्यात कर्णधार रहाणेनं शतकी खेळी करताना टीम इंडियाचा डाव सावरला. चेतेश्वर पुजाराचे अर्धशतक आणि कुलदीप यादवची संयमी खेळी, याची रहाणेला साथ मिळाली.
रहाणेच्या नेतृत्वाखाळी खेळणाऱ्या भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण, पृथ्वी शॉ आणि शुबमन गिल यांनी निराश केले. दुसऱ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर गिल ( ०) मिचेल नेसेरच्या गोलंदाजीवर माघारी परतला. पुढच्या षटकात जेम्स पॅटिन्सननं टीम इंडियाला धक्का देताना पृथ्वी शॉ ( ०) याला बाद केले. चेतेश्वर पुजारा ( Cheteshwar Pujara) आणि हनुमा विहारी यांनी तिसऱ्या विकेटसाठी ४० धावा जोडताना टीम इंडियाची गाडी रुळावर आणली. जॅक्सन बर्डनं विहारीला ( १५) पायचीत केले. त्यानंतर आलेल्या कर्णधार रहाणेनं चौथ्या विकेटसाठी पुजारासह टीम इंडियाचा डाव सावरला.
दोघांनी संयमी खेळ करताना ७६ धावांची भागीदारी केली. पुजारानं १४० चेंडूंत ५ चौकारासह ५४ धावा केल्या. पॅटिन्सननं त्याला बाद केले. वृद्धीमान सहा ( ०) याला ट्रॅव्हिस हेडनं,तर आर अश्विनला (५) पॅटिन्सननं बाद केले. संघ अडचणीत असताना रहाणे खेळपट्टीवर तग धरून उभा आहे. त्यानं कुलदीप यादवला सोबतीला घेताना संघाच्या धावा वाढवण्याचा प्रयत्न सुरू ठेवला आहे. या दोघांनी सातव्या विकेटसाठी ६९ धावा जोडल्या. कुलदीपनं ७८ चेंडूंत १५ धावा केल्या. ट्रॅव्हिस हेडनं त्याला बाद केले. अजिंक्य खिंड लढवत आहे. त्यानं २०३ चेंडूंत १५ चौकार व १ षटकारासह शतक पूर्ण केले. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील ३४वे शतक ठरले, परंतु कर्णधार म्हणून पहिलेच...
उमेश यादवनं १८ चेंडूंत ४ चौकार व १ षटकारासह २४ धावांची आक्रमक खेळी केली. रहाणे पहिल्या दिवसअखेर २२८ चेंडूंत १६ चौकार व १ षटकारासह १०८ धावांवर नाबाद आहे. टीम इंडियानं ८ बाद २३७ धावा केल्या.
Web Title: IND vs AUS : Ajinkya Rahane brings up his 34th first-class hundred in India's tour match against Australia A, Indians 8/237
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.