सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : खेळ म्हटला की जिंकण्याची इर्षा आली, खुन्नस आली. पण आजचा सिडनी क्रिकेट मैदानातील दिवस निराळाच होता. कारण आजच्या दिवसाची सुरुवात झाली ती गुलाबी रंगाने. आज पूर्ण मैदान गुलाबी रंगात न्हाहून निघाले होते. पण आजच्या दिवसाचे महत्व तुम्हाला माहिती आहे आहे का...
ऑस्ट्रेलियाचा माजी महान गोलंदाज ग्लेन मॅग्राची पत्नी जेनचे स्तनाच्या कर्करोगाने निधन झाले होते. यापुढे कोणाचाही कर्करोगाने मृत्यू होऊ नये, हे ग्लेनने ठरवले आणि एक फाऊंडेशन सुरु केले. वर्षातील पहिला सामना हा या फाऊंडेशनसाठी ठेवला जातो. त्यामुळे आजच्या दिवशी साऱ्या मैदानात गुलाबी रंगच दिसत होता.
भारताच्या क्रिकेटपटूंनीही यावेळी मॅग्राच्या फाऊंडेशनला मदत करण्याचे ठरवले होते. त्यामुळे जेव्हा आजच्या दिवसाची सुरुवात झाली तेव्हा प्रत्येक खेळाडू गुलाबी रंगाची टोपी घेऊन मैदानात उतरला होता. भारताच्या प्रत्येक खेळाडूने या टोपीवर आपली सही केली होती आणि या टोप्या मॅग्राच्या फाऊंडेशनला देण्यात आल्या.