IND vs AUS 5th T20I Live : भारतीय संघाला पाचव्या ट्वेंटी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियावर विजय मिळवून मालिका ४-१ अशी जिंकली. श्रेयस अय्यरच्या अर्धशतकी खेळीनंतर रवी बिश्नोई, मुकेश कुमार आणि अक्षर पटेल यांच्या अप्रतिम गोलंदाजीच्या जोरावर भारताने १६० धावांचा यशस्वी बचाव केला आणि हा सामना जिंकला. शेवटच्या षटकांत अर्शदीप सिंगने अप्रतिम मारा करून ऑसींच्या तोंडचा घास पळवला. शेवटच्या षटकात विजयासाठी १० धावा हव्या असताना अर्शदीपने केवळ ३ धावा दिल्या आणि मॅथ्यू वेडची विकेट घेऊन मॅच फिरवली.
श्रेयस अय्यरच्या फिफ्टीच्या जोराव तगडे आव्हान उभे करता आले. श्रेयस अय्यरने अखेरच्या षटकांत जोरदार फटकेबाजी केली. यशस्वी जैस्वाल, जितेश शर्मा आणि अक्षर पटेल यांनी उपयुक्त खेळी केली. यशस्वी जैस्वाल ( २१) आणि ऋतुराज गायकवाड ( १०) यांना आज मोठी खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव ( ५) व रिंकू सिंग ( ६ ) हेही आज फेल केले. जितेश शर्मा ( २४) व श्रेयस अय्यर यांनी २४ चेंडूंत ४२ धावांची भागीदारी केली, परंतु आरोन हार्डीने ही सेट जोडी तोडली. अक्षर पटेलने ( ३१) श्रेयसला उत्तम साथ दिली आणि ४६ धावा जोडल्या. श्रेयसने ३७ चेंडूंत ५ चौकार व २ षटकारांसह ५३ धावा केल्या. भारताने २० षटकांत ८ बाद १६० धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात ट्रॅव्हिस हेडने पहिल्याच षटकात १४ धावा कुटल्या. पण, मुकेश कुमारने तिसऱ्या षटकात जोश इंग्लिसला ( ४) बाद केले. रवी बिश्नोईची फिरकी पुन्हा कामी आली. त्याने हेड ( २८) व आरोन हार्डी ( ६) यांच्या विकेट्स मिळवल्या. ऑस्ट्रेलियाने पहिल्या १० षटकांत ३ बाद ७० धावा केल्या होत्या. बेन मॅकडेर्मोट व टीम डेव्हिड यांनी ४७ धावांची भागीदारी करताना ऑस्ट्रेलियाचा डाव सावरला होता. अक्षर पटेलने १४व्या षटकांत डेव्हिडला ( १७) बाद केले. १५व्या षटकात अर्शदीप सिंगने ऑस्ट्रेलियाचा सेट फलंदाज मॅकडेर्मोटला ( ५४) बाद केले, परंतु त्याने फटकेबाजीने धावा व चेंडू यांच्यातले अंतर कमी केले होते.
ऑस्ट्रेलियाला ३० चेंडूंत ४५ धावाच करायच्या होत्या. मुकेश कुमारने मोक्याच्या क्षणी मॅथ्यू शॉर्टला ( १६) आणि बेन ड्वॉर्शूईसला ( ०) बाद करून ऑसींना मोठा धक्का दिला. १७व्या षटकात मुकेशने सामनाच फिरवला होता. पण, १८व्या षटकात आवेश खानच्या गोलंदाजीवर कर्णधार मॅथ्यू वेडने सलग तीन चौकार खेचून दडपण हलकं केलं. त्या षटकात १५ धावा आल्याने ऑसींना अखेरच्या १२ चेंडूंत १७ धावा करायच्या होत्या. मुकेशच्या पुढच्या षटकात वेडचा झेल उडाला होता, ऋतुराजने तो टिपण्यासाठी स्वतःला झोकून टाकले, परंतु त्याला थोडक्यात अपयश आले.
६ चेंडूंत १० धावा ऑसींना हव्या होत्या. त्यात अर्शदीपने पहिलाच चेंडू बाऊन्सर टाकला, मॅथ्यू वेड वाईडसाठी मागणी करताना दिसला. अर्शदीपने पहिले दोन चेंडू निर्धाव टाकली. तिसऱ्या चेंडूवर वेड ( २२) झेलबाद झाला. पाचव्या चेंडूवर अम्पायर जखमी होता होता थोडक्यात वाचले. ऑस्ट्रेलियाला ८ बाद १५४ धावाच करता आल्या आणि भारताने ६ धावांनी सामना जिंकला.